Nana Patekar : …अन् हसन हसन म्हणताच गाडी धडकली! कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या भेटीनंतर नाना पाटेकरांनी सांगितला धमाल किस्सा
हसन मुश्रीफ यांचा एकेरी उल्लेख करताच अचंबित झालेल्या कार्यकर्त्यांना माझा जवळचा दोस्त आहे. गैरसमज करून घेऊ नका, असे पाटेकर म्हणाले. तर काही दिवसांपूर्वी मुंबईत घडलेला एक मजेदार किस्साही त्यांनी सांगितला.
कोल्हापूर : सिने अभिनेते नाना पाटेकर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या भेटीचा मजेदार किस्सा काल कोल्हापूरमधून घडला. नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मुश्रीफ यांचा केलेला एकेरी उल्लेल, त्यानंतर त्यांनी केलेला खुलासा आणि नंतर दोघांमध्ये रंगलेल्या गप्पा हा सध्या कोल्हापुरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी मुंबईतील एक धमाल किस्साही नाना पाटेकरांनी सांगितला. त्याचे झाले असे, की कागलमध्ये (Kagal, Kolhapur) उभारण्यात आलेल्या महापुरूषांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी नाना पाटेकर कोल्हापूरमध्ये आले. नाना पाटेकर आदल्या दिवशीच कोल्हापुरात आल्याचे समजताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ त्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. यावेळी मुश्रीफ यांना पाहताच, अरे तू इकडे कशाला आलास. मी तुझ्याकडे येणार होतो, असे म्हणत नाना पाटेकर यांनी मुश्रीफांना मिठी मारली.
‘गैरसमज करून घेऊ नका’
नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांचा केलेला एकरी उल्लेख ऐकून त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते अचंबित झाले. या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील भाव नाना पाटेकर यांनी टिपले. यावेळी नाना पाटेकर यांनी माझा जवळचा दोस्त आहे रे, गैरसमज करून घेऊ नका, असे सांगत खुलासा केला. हसन मुश्रीफ यांनीही पाहुण्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य करणे कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत, असे म्हणत नाना पाटेकर यांना दाद दिली. यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या.
नाना पाटेकर यांनी सांगितला ‘तो’ धमाल किस्सा
हसन मुश्रीफ यांचा एकेरी उल्लेख करताच अचंबित झालेल्या कार्यकर्त्यांना माझा जवळचा दोस्त आहे. गैरसमज करून घेऊ नका, असे पाटेकर म्हणाले. तर काही दिवसांपूर्वी मुंबईत घडलेला एक मजेदार किस्साही त्यांनी सांगितला. मुंबईच्या रस्त्यावरून जाताना मला हसन दिसला. मी हसन हसन असे म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली. हा किस्सा सांगताच हसन मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांमध्येदेखील हशा पिकाला.
समाजसुधारकांच्या पुतळ्याचे अनावरण
कागल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर या समाजसुधारकांची पुतळे बसवण्यात आलेत. या पुतळ्याचा अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.