Nana Patole Vs Raj Thackeray : मी स्वत: हिंदू, रोज हनुमान चालिसा वाचतो, नाना पटोलेंचा ‘बाऊ’ न करण्याचा सल्ला, नाना बॅकफुटवर?
Nana Patole Vs Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. मी स्वत: हिंदू आहे. रोज हनुमान चालिसा वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्याचा बाऊ करू नये.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालिसाच्या (hanuman chalisa) मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी उडी घेतली आहे. मी स्वत: हिंदू आहे. रोज हनुमान चालिसा वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्याचा बाऊ करू नये, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. पटोले यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पटोले यांची ही भूमिका म्हणजे पटोले बॅकफूटवर आल्याचं द्योतक असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेने कडक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यात होते. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भोंगे उतरविण्याचा पुनरुच्चार केला. 3 मे पर्यंत वाट पाहू. मनसैनिकांनी तयार राहावे, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे भोंग्यावरून येत्या काही काळात राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला व्हिडीओही दाखवला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही व्हिडीओ दाखवला. राज ठाकरे केवळ कॉमेंट्री करत आहेत. ज्याची सुपारी घेतात ते करतात. महागाईवरून लक्ष बाजूला करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. धर्माला कोणाचा विरोध नाही. पण कोणी बाऊ करू नये, असा सल्ला पटोले यांनी राज ठाकरे यांना दिला.
एकात्मता संपवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रात एकात्मता, बंधूभाव संपविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. केंद्रसरकारचे अपयश लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनात केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाला. राज ठाकरे यांच्या बाबत फडणवीस यांनी सुपारी घेतल्याचे म्हटले होते. आता राज ठाकरे यांनी त्यांची सुपारी घेतली आहे. आम्ही सर्वधर्म समभाव पाळतो. मी सकाळी हनुमान चालिसा वाचूनच बाहेर पडतो, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा भोंग्यांवरून सरकारला इशारा देतानाच मनसे कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. 3 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यानंतर आम्ही वाट पाहणार नाही. तुम्ही जितक्या वेळा भोंगे लावाल. तितक्या वेळा मशिदी समोर हनुमान चालिसा लावला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या: