‘माझ्यामुळेच इतरांची तब्येत खराब होते’, नाना पटोले यांचं एक वाक्य मविआत दरार आणणार?
छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहिले आणि उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. खासदार संजय राऊतांनी पटोलेंच्या तब्येतीचं कारण सांगितलं. पण माझी तब्येत ठीक असून माझ्यामुळंच इतरांची तब्येत खराब होते, असा इशारा पटोलेंनी दिला.
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) पहिलीच सभा होती. त्या सभेत ठाकरे गटाकडून स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंसह स्थानिक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंनी हजेरी लावली. पण काँग्रेसकडून स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच कसे नाहीत? यावरुन उलट सुलट चर्चा सुरु झाली. पटोले नव्हते पण अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात मंचावर उपस्थित होते.
आता मविआची पहिलीच सभा आणि त्यात, काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष नाही म्हटल्यावर चर्चा होणं स्वाभाविक होतंच. पण त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पटोलेंची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळं पटोले आले नाहीत, असं राऊत म्हणालेत. पण राऊतांचं असं बोलणं पटोलेंना अजिबात आवडलं नाही. आपली तब्येत ठीक होती. आपल्यामुळंच दुसऱ्यांची तब्येत खराब होत असेल, असा पलटवार पटोलेंनी केला.
नाना पटोले मुंबईतच होते आणि आराम करत होते, असं संजय राऊत सांगतायत. पण आपण दिल्लीला गेलो होतो आणि राहुल गांधींच्या सुरत दौऱ्याची आखणी सुरु होती, असं पटोले सांगतायत. विशेष म्हणजे पटोले संभाजीनगरच्या सभेत नव्हते. पण सुरतमध्ये राहुल गांधींच्या कोर्टातल्या हजेरीवेळी त्यांच्यासोबत होते. यावरुन राऊतांना पुन्हा पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर, पटोलेंना सुरतला जायचं होतं, म्हणूनच त्यांनी मुंबईत दिवसभर आराम केल्याचं राऊत म्हणालेत.
आता प्रश्न हा आहे की, नाना पटोले छत्रपती संभाजीनगरमध्ये का आले नाहीत? तर त्याची 2 कारणं असू शकतात. सुरतमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यावरुन रणनीती आखण्यासाठी पटोले दिल्लीत होते. त्यामुळं ते संभाजीनगरच्या सभेत आले नाहीत. दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना इशारा दिला होता. हेच काँग्रेसमधल्या एका गटाला आवडलं नसल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींबद्दल बोलायला नको होतं, असं काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटतंय. आणि स्वत: नाना पटोले हे राहुल गांधींच्या जवळचे आहेत. त्यामुळे सभेला गैरहजर राहून पटोलेंनी नाराजी दाखवल्याची शक्यता आहे.
पटोले छत्रपती संभाजीनगरला आले नाही पण सुरतला राहुल गांधींसोबत ते होते. पंतप्रधान मोदींवर टीका करताना, मोदी आडनावावरुन टिप्पणी केल्यानं, मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झालीय. त्यासाठी त्यांनी सुरतच्या सत्र न्यायालयात धाव घेतली.
जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टानं, 13 एप्रिलपर्यंत राहुल गांधींच्या जामिनाला मुदतवाढ दिलीय. तर शिक्षा स्थगितीच्या याचिकेवर 13 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तर 2 वर्षांची शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी होईल. राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळवायची असेल तर, शिक्षेला स्थगिती मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी 13 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल.