सांगा कुठून आणायचे पैसे? महादेव कोळी समाजाची व्यथा, ‘जात प्रमाणपत्रासाठी अडवणूक, लाचखोरांचा सुळसुळाट’… काय आहेत आरोप?
जो लाच म्हणून पैसे देतो त्याला तातडीने जातीचे प्रमाणपत्र दिल्या जातंय. मात्र जो पैसे देऊ शकत नाही त्याच्या अर्जात त्रुटी काढण्यात येत आहेत, असा आरोप महादेव कोळी समाजाचे नेते परमेश्वर गोणारे यांनी केलाय.
राजीव गिरी, नांदेड : गेल्या महिन्यात आक्रमक आंदोलन केल्यानंतर नांदेडमधील (Nanded) आदिवासी महादेव कोळी (Mahadev Koli) समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलाय. जातीच्या प्रमाणपत्रासाठी अडवणूक होत असल्याचा आरोप या समाजातील लोकांनी केलाय. नांदेडमध्ये आज कोळी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलय. जोवर जातीचे प्रमाणपत्र मिळणार नाहीत तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय. यावेळी आंदोलकांनी जोरदारपणे नारेबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय. आता हे आंदोलन सातत्याने सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीय
नेमकी समस्या काय ?
नांदेडमध्ये आदिवासी महादेव कोळी समाजाला जातीच्या प्रमाण पत्रासाठी पन्नास वर्षांपूर्वीचे पुरावे मागण्यात येत आहेत. मुळात अशिक्षित आणि बहुतांशी मजूर वर्ग असलेल्या या समाजाकडे फारश्या जुन्या नोंदी नाहीत. केवळ या सबबीखाली त्यांना जातीचे प्रमाणपत्र देताना टाळाटाळ केल्या जातेय. त्यामुळेच आदिवासी महादेव कोळी समाजाने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रलंबित असलेले जातीचे शेकडो प्रमाणपत्र तातडीने द्यावे अन्यथा आम्ही इथून हलणार नाही असा इशारा देत समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलय.
लाचखोरीचा आरोप
आदिवासी महादेव कोळी समाजाने प्रशासनावर लाचखोरीचा आरोप केलाय. जो लाच म्हणून पैसे देतो त्याला तातडीने जातीचे प्रमाणपत्र दिल्या जातंय. मात्र जो पैसे देऊ शकत नाही त्याच्या अर्जात त्रुटी काढण्यात येत आहेत असा आरोप महादेव कोळी समाजाचे नेते परमेश्वर गोणारे यांनी केलाय. इतकंच नाही तर आजवर दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय. त्यामुळे हा वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे आहेत.
मयुरी प्रकरणावरून मागील महिन्यात आंदोलन
छत्रपती संभाजीनगर इथल्या जात पडताळणी समितीने नांदेडच्या मयुरी पूजरवाड या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या आदिवासी बांधवांनी चक्क देव देवतांचा त्याग करत आंदोलन केले होते. नांदेड जिल्ह्यातील मयुरी पुंजरवाड ही आदिवासी कोळी समाँजाची विद्यार्थिनी एम बी बी एस झाली असून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिने छत्रपती संभाजीनगरच्या जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज दिला होता. समितीने वैधता तपासणी करत जात वैधता नाकारली. अर्जदार मयुरीने महादेवाची पूजा केल्याचे जात पडताळणी समितीने अहवाल दिला होता.
महादेव आणि खंडोबाची पूजा साधारणतः हिंदू धर्मात केली जाते. तसेच अर्जदाराची विवाह पद्धती हिंदू प्रमाणे असल्याची सबब देत जात पडताळणी समितीने जातीची वैधता नाकारली. या निकालानंतर आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले होते. त्या नंतर नांदेड मध्ये शेकडो आदिवासी महिला आणि बांधवांनी देव सोबत घेत देव देवतांचा त्याग करण्यासाठी आंदोलन केले. मोर्चाला परवानगी न दिल्याने आदिवासी कोळी बांधवांनी आय टी आय चौकात सभा घेत तहसीलदार आंबेकर यांच्याकडे आपल्या देव देवता सुपूर्द केल्या होत्या. आता आजपासून याच महादेव कोळी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलय.