नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास अडचण, एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला हलवणार
नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची आज अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण वसंत चव्हाण यांना आता हैदराबादच्या रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वसंत चव्हाण यांचा अचानक बीपीदेखील कमी झाला. तसेच अस्वस्थ देखील वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. संबंधित रुग्णालयात डॉक्टरांनी वसंत चव्हाण यांच्यावर उपचार केले. यानंतर त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यानुसार आता वसंत चव्हाण यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत चव्हाण यांना नांदेड विमानतळाववरुन एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेलं जात आहे. तिथे किम्स हॉस्पिटलमध्ये वसंत चव्हाण यांना दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या उपचारासाठी सर्व तयारी केली जात आहे. सध्या वसंत चव्हाण यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. पण वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडल्याची बातमी नांदेड शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे.
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या समर्थकांकडून वसंत चव्हाण लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली जात आहे.