नांदेडचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क तुटला
नांदेडचे अभियंता योगेश पांचाळ हे इराणमध्ये व्यावसायिक कामानिमित्त गेले आहेत. पण ते 7 डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. त्यांची पत्नी श्रद्धा पांचाळ यांनी सरकारकडे मदत मागितली आहे.
वसमत येथील कारखाना रोड भागातील रहिवासी असणारे अभियंता योगेश उत्तमराव पांचाळ हे नांदेडमध्ये पत्नीसह राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीयोग एक्सपोर्ट नावाने नवीन कंपनीची नोंदणी केली होती. योगेश पांचाळ इराण येथील सादीक नावाच्या व्यक्तीची कंपनी पाहण्यासाठी 5 डिसेंबरला मुंबई येथून इराण येथे गेले. त्या ठिकाणी ते तेहराणमधील बहारेस्तान हेरिटेज या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांचा व्हिडीओ कॉलवरून सादीक याच्याशी संपर्कही झाला होता. तसेच त्यांनी नांदेड येथे पत्नी आणि लहान मुलाशी संपर्क केला होता. मात्र त्यानंतर 7 डिसेंबर पासून त्यांचा संपर्कच झाला नाही.
योगेश पांचाळ यांचा परतीचा प्रवास 11 डिसेंबरला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या विनंतीनंतर प्रशासनाने विमानतळावर संपर्क साधला असता योगेश विमानात बसलेच नसल्याचे सांगण्यात आले. योगेश यांना 24 दिवसांपासून संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. योगेश यांच्या पत्नी श्रद्धा पांचाळ यांनी या संदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच नांदेड पोलीस अधीक्षक आणि खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सरकारने माझ्या पतीचा शोध लावावा, अशी विनंती योगास पांचाळ यांच्या पत्नी श्रद्धा पांचाळ यांनी केली आहे.
‘माझ्या पतीला शोधून द्यावे’
“एक्सपोर्ट बिजनेसची माहिती घेण्यासाठी माझे पती इराकमध्ये गेले होते. मात्र त्यांचा 7 डिसेंबर पासून संपर्क होत नाही. मी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खासदार अशोक चव्हाण, डॉक्टर अजित कडकडे यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून माझ्या पतीला शोधून द्यावे”, अशी मागणी श्रद्धा पांचाळ यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
या प्रकरणी नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. “जिल्हा पोलिसांची भूमिका यामध्ये लिमिटेड असते. आम्ही सेंट्रल लेव्हलवर सीबीआय एजन्सी आहे आणि स्टेट लेव्हलवर सीआयडी ही सीबीआयला कॉर्डिनेट करते. यावर आमचा पूर्ण पत्र व्यवहार झाला आहे. पाठपुरावा सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षकांनी दिली.