नांदेडमध्ये महिला मजुरांना ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे एक भीषण अपघात घडला आहे. हळद काढणीसाठी जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातात आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरू आहे. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. परिसरात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यात आता नांदेडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. यामुळे तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टर जात होतं. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत.
कशी घडली घटना?
यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7 ते 7.30 या दरम्यान घडली. सध्या या भागात पाऊस सुरु आहे. यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने ही घटना घडली. यानंतर आम्ही लगेचच यातील काही महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं. त्या महिला विहिरीतून बाहेर आल्यानंतर इतरांना बाहेर काढा, असे सांगत होत्या. पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लीप झाला. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत पडला.