Narasayya Adam: आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवले यात काही प्रमाणात तथ्य; आडम मास्तरांनी दाखवला आरसा
Narasayya Adam: सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार, जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटलो.
सोलापूर: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) घेरलेलं असतानाच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही राज्य सरकारला आरसा दाखवला आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राज्यातील महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवलं यात काही प्रमाणात तथ्य आहे. कारण मध्यप्रदेश सरकारने आरक्षण टिकवलं. मग महाराष्ट्र सरकारला ते टिकवता का आले नाही? असा सवाल माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम (Narasayya Adam) यांनी केला आहे. ओबीसी आरक्षण न टिकण्यात महाविकास आघाडीच्या नक्कीच काहीतरी चुका आहेत. या चुका त्यांनी दुरुस्त कराव्यात. अन्यथा जनता त्यांना नक्कीच शिक्षा देईल, असा इशाराही आडम यांनी दिला आहे. तर, आम्ही मध्यप्रदेश सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी जे केलं त्याचा अभ्यास केला आहे. बांठिया समितीकडून इम्पिरिकल डेटा मिळाल्यानंतर आम्ही जूनमध्ये कोर्टात जाऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार, जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटलो. त्यांच्याशी निवडणूकपूर्व आघाडीबाबत चर्चा केली. मात्र निवडणुका जाहीर झाल्यावर आम्ही आघाडीबाबत विचार करू असे उत्तर मविआ नेत्यांनी दिलं. मात्र एकत्र आलो तरच भाजपला आपण रोखू शकतो. अन्यथा भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. भाजपची सत्ता आल्यावर बोलून काहीही उपयोग नाही, असं नरसय्या आडम यांनी सांगितलं. दरम्यान, या आघाडीबाबत आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करतोय, असे त्यांनी सांगितले.
प्रणिती शिंदेंसोबत चर्चा नाही
यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधक आणि काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रणिती शिंदे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र भाजपला हरवायचे असेल तर आपसातले हेवेदावे विसरुन एकत्र यावे लागेल, असं ते म्हणाले. माझी विनंती राहणार आहे की, स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे लोकांना सुविधा देण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आघाडीलाच फटका?
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने माकपासोबत निवडणुकीत आघाडी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सोलापुरात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच माकप स्वबळावर लढल्यास त्याचा फटका आघाडीलाच बसणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे सोलापूरच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.