Narayan Rane:नारायण राणे म्हणतात, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 20 आमदारही निवडून येणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची का केली मागणी वाचा..
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जेवढी मतं मिळायला हवी होती, तेवढीही मतं आघाडीला मिळालेली नाहीत. उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे की सत्तेला 145 मते लागता, तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या, नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या. असे नारायण राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग – राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपाचे नेते शिवसेनेवर तुटून पडले आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांना लक्ष्य केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election)शिवसेनेची 20 आमदारही निवडून येणार नाहीत, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे. येणारी महापालिका निवडणूकही भाजपाच जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वताला वाघ म्हणवतात, पण प्रत्यक्षात शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नसल्याचे राणे म्हणाले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर सिंधुदुर्गात भाजपाने विजयोत्सव साजरा केला, त्यावेळी राणे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतील नातेही उद्धव ठाकरेंनी धुळीला मिळवल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला
सरकार अल्पमतात आल्याचा राणेंचा दावा
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जेवढी मतं मिळायला हवी होती, तेवढीही मतं आघाडीला मिळालेली नाहीत. उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे की सत्तेला 145 मते लागता, तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या, नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या. असे नारायण राणे म्हणाले. सत्तेवर राहण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नसल्याचेही राणे म्हणाले. आघाडीतील 8-9 आमदार फुटतात तर विश्वासहर्तता आहे कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्वताचे आमदार सांभाळता येत नाहीत, आणि बढाया मारतात. अशी टीका त्यांनी केली. आम्ही विरोधात असूनही आमदार एकसंध ठेवू शकलो. भाजपाची मते जास्त आहेत. असा दावाही त्यांनी केला.
राऊत काठावर निवडून आलेत.
राज्यसभा निवडणुकीपूर्वी काही जण बढाया मारत होते, तीन जागा काढणार, भाजपाची मतं फोडणार, मात्र प्रत्यक्षात काय झालं, असा सवाल राणेंनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात न वापरलेली भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली. मुख्यमंत्र्यांची भाषा संसदीय नव्हती, अशी टीकाही राणेंनी केली. पराभवामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशात नामुष्की, बेअब्रू झाली. असेही राणे म्हणाले. संजय राऊत काठावर आलेत, आमच्या हातातून वाचले आहेत, असे म्हणत त्यांनी राऊतांनाही इशारा दिला आहे.
कधीतरी कुणाला चांगलं म्हणा
शरद पवारांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. फडणवीस यांनी माणसं, आमदार सांभाळले. पवारांनी त्यांचं कौतुक केलं. माणुसकीचा धर्म पवारांनी पाळला. कुणाला कधीतरी चांगलं म्हणा, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.