उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी कधी भिकाऱ्यांना भीक पण दिली नाही, नारायण राणेंची जीभ घसरली
नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे AI तंत्रज्ञानाने तयार केलेले भाषण दाखवण्यात आले. यामुळे राजकारणात जोरदार वाद निर्माण झाला आहे. भाजपसह महायुतीवर टीका करणारे हे भाषण नारायण राणे यांनीही टीका केली आहे.

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं AI तंत्रज्ञानाचा वापर करुन भाषण दाखवण्यात आलं. या व्हिडीओमध्ये AI टेक्नोलॉजीचा वापर करत बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील भाषण दाखवण्यात आले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो… असे शब्द कानावर पडताच नाशिकमध्ये उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या अंगावर काटा आला. यानंतर सभागृहात सर्वत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाज घुमला. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलमध्ये भाजपसह महायुतीवर टीका करण्यात आली. आता यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
ठाकरे गटाच्या मेळाव्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या AI तंत्रज्ञानातील भाषणावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता यावर खासदार नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. त्यांचे पुढच्यावेळी पाच आमदारही नसतील, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.
“मी साहेबांचा शिवसैनिक”
“आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. आता त्यांचे विचारही उद्धव ठाकरेंनी सोडले आहेत. घरी कॅसेट असतील त्या त्यांनी रात्रभर ऐकाव्यात. ते कधी लोकांपर्यंत गेले नाहीत. शिवसैनिकांना प्रेम दिल केलं नाही जे साहेबांनी केलं. उध्दव ठाकरे यांचे पुढच्यावेळी पाच आमदार नसतील. एकनाथ शिंदे हे आता आहेत. तो त्या लायकीचा नाही. त्यांनी विचारावे मी साहेबांचा शिवसैनिक आहे. तो आपल्या समोर टिकणार नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कधी भिकाऱ्यांना भीक पण दिली नाही”, अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
नारायण राणे यांनी आज बेस्ट उपक्रमाला भेट दिली. यावेळी जनरल मॅनेजर (जीएम) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. समर्थ कामगार सेनेच्या सदस्यांना सोबत घेऊन राणे यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला
“बेस्ट ही मुंबईकरांची ओळख आहे आणि त्यांनी चांगली सेवा देणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी आज येथे आलो होतो. या बैठकीत एकूण पाच प्रमुख प्रश्नांवर चर्चा झाली, ज्यात कर्मचाऱ्यांचे प्रलंबित निवृत्ती वेतन आणि कोविड भत्ता यांचा समावेश होता.बेस्टची सध्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केले. पूर्वीची आणि आताची परिस्थिती यात मोठा फरक असून, बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे. संस्थेला मोठ्या मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ १५०० बस असून, प्रत्यक्षात ८००० बसची आवश्यकता आहे, असेही नारायण राणेंनी नमूद केले.
जीएम स्तरावर हे प्रश्न सुटण्यासारखे नाहीत. आता मी स्वतः राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहेत. येत्या १० दिवसात मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बीएमसी आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने मदत केल्यास बेस्ट मुंबईत टिकून राहील, असे मत नारायण राणेंनी व्यक्त केले.