कोकणात शिंदे गटाचा भ्रमनिरास होणार? नारायण राणे यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
कोकणात लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय शिमगा रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांतच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. असं असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट केल्यामुळे याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
सिंधुदुर्ग | 29 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महायुतीमधील मित्रपक्षांकडून अनेक जागांवर दावा केला जातोय. त्यामुळे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. असं असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार आहे, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनीदेखील या मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरु केली आहे. त्यांनी अनेकवेळा आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं जाहीरपणे बोलूनही दाखवलं आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी नवं ट्विट केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
“लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 29, 2024
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाचं राजकीय गणित काय?
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे खासदार आहेत. ते गेल्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये या मतदारसंघांमधून निवडून येत आहेत. तर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकीटावर 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यानंतर सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. या दरम्यान त्यांचे वडील नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपने राज्यसभेची संधी दिली. पण आता त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेची संधी दिलेली नाही. त्यामुळे नारायण राणे यांना लोकसभेची संधी दिली जाईल. ते लोकसभा निवडणूक लढवणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे या मतदारसंघात शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत. त्यांच्याकडून अनेक वेळा तशी इच्छा व्यक्त करण्यातही आली आहे. तर भाजपकडून याआधी आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा होती. यानंतर पुढे निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. आता नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेची जास्त ताकद आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जातोय. पण आता शिवसेनेत फुट पडली आहेत तसेच निलेश राणे या मतदारसंघातले माजी खासदार आहे. नितेश राणे याच मतदारसंघातून आमदारही आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्याकडून आता या मतदारसंघातून दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत आगामी काळात काय काय? घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.