रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत लढत, संजय राऊतांनी डिवचलं
रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय. लातूरमध्ये काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांनी अर्ज दाखल केलाय तर धाराशीवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.
Loksbha election : रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांनी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नारायण राणे यांची थेट लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. तर संजय राऊतांनी आम्हाला विरोधात राणेच हवे होते, असं म्हणत डिवचलं आहे.
आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी अर्ज भरला. अर्ज भरण्याच्या निमित्तानं राणेंनी रॅलीच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीतील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत राणेंची रॅली निघाली. भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासह सामंतांचे बंधू किरण सामंतही उपस्थित होते. आधी किरण सामंतही रत्नागिरी सिंधुदुर्गातून लढण्यासाठी इच्छुक होते. शक्तिप्रदर्शनानंतर राणेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला आणि त्यानंतर विजयाचा विश्वास व्यक्त केला.
महायुतीला मनसेचा पाठिंबा
महायुतीला राज ठाकरेंच्या मनसेनंही पाठींबा दिलाय. त्यामुळं मनसेचे नेते अविनाश जाधवही राणेंचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आता नारायण राणेंचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊतांशी आहे. अडीच ते 3 लाखांनी विजयी होणार असा दावा राणेंचा आहे.
भाजपनं राणेंना उमेदवारी दिल्यानं हा सामना पुन्हा ठाकरे विरुद्ध राणे असाही आहे. याआधी 2 वेळा ठाकरेंच्या उमेदवारानं राणेंना एकदा आमदारकीच्या निवडणुकीत आणि एकदा लोकसभेत पराभूत केलंय.
अर्चना पाटील यांचाही उमेदवारी अर्ज दाखल
इकडे धाराशीव आणि लातूरमध्येही अर्ज दाखल झाले आहेत. लातूरमध्ये काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत मेळावाही पार पडला. तर धाराशीवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला.
अर्चना पाटलांचा अर्ज भरण्यासाठी स्वत: अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत हजर होते. अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं धाराशीवमध्ये प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. जिजाऊ चौकातून निघालेली रॅली ग्रामदैवत हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गा पर्यंत आली. इथं अजित पवारांनी चादर चढवली. त्यानंतर ही रॅली धारासूर मर्दिनी मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालपर्यंत आली.