cabinet expansion : मोदी मंत्रिमंडळात शिंदे गटातून दोघांना संधी, शिंदे गटातील नेत्याचा दावा
cabinet expansion : राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारासंदर्भात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. मोदी मंत्रिमंडळात दोघांना संधी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
दत्ता कानवटे, संभाजीनगर : राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचा निर्णय योग्य
टीव्ही ९ मराठी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झाला हा भाजपचा दावा बरोबर आहे. आम्हीसुद्धा शिवसेना भाजपचे सरकार येईल, या आनंदात होतो, पण अचानक बदल झाल्याने आपण भाजप सोबत जाणार नाही, असं कळले. मग त्यावेळी भाजपने जी खेळी केली, ती योग्य होती.
संजय राऊत यांच्यांवर टीका
कर्नाटकच्या निकालाचा काही परिणाम दुसऱ्या राज्यावर होणार नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. त्यावेळी संजय राऊत यांना टोलाही मारला. ते म्हणाले, इतरांच्या आनंदात आनंद साजरा करण्यात यांना इंटरेस्ट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हे दिवस आले आहेत. उद्धव ठाकरे यांना इतकं लाचार संजय राऊत यांनी केलीय त्याची आम्हाला लाज वाटतेय.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या दहा दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनीही सांगितली होती तारीख
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. 18-19 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे फोन आमदार एकमेकांना करत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल आणि त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होईल, असं बच्चू कडू म्हणाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. या विस्तारात माझी वर्णी कधी लागणार की नाही, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द होता. ते आपला शब्द पाळतील,असे बच्चू कडू यांनी सांगितले होते.