पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या विविध खासदारांनी मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून अठराव्या लोकसभेत निवडून गेलेले खासदार नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव, आरपीए पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधीच्या कार्यक्रमात मोदींनी एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात 7 खासदार निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पक्षाला एकही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तसेच रामदास आठवले यांना गेल्या सरकारमध्येही राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. यावेळीदेखील त्यांना राज्यमंत्रीपदच देण्यात आलं आहे.
महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही भाजपकडून राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. पण अजित पवार गटाने राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली होती. अजित पवार गटाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी हवी होती. पण भाजपकडून त्यांना केवळ राज्यमंत्रीपदासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार गटाने ती ऑफर नाकारली. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा अजित पवार गटाचा विचार केला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.