NASA ची जेम्स वेब दुर्बिण आज अंतराळात झेपावणार, औरंगाबादेत हुबेहुब प्रतिकृती, विद्यार्थ्यांना Live पाहण्याची संधी
जगभरातील खगोल अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाची घटना आज घडतेय. अमेरिकन अंतराळ संस्था नासाची जेम्स वेब ही अत्याधुनिक दुर्बिण आज अंतराळात झेपावणार आहे. औरंगाबादेत यानिमित्त जागतिक घटनेचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विशेष खगोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबादः आज दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, संध्याकाळी 5.30 वाजता अमेरिकन नासा संस्थेकडून ‘जेम्स वेब’ ही आधुनिक दुर्बिण अंतराळात पाठवली जाणार आहे. जगातील खगोल अभ्यासकांसाठी हा अत्यंत मोलाचा टप्पा ठरणार आहे. विश्व उत्पत्तीच्या अद्भूत व गूढ संकल्पनांचा शोध या टेलिस्कोपच्या (Telescope) माध्यमातून घेतला जाईल. औरंगाबादकरांसाठी आणखी महत्त्वाचे म्हणजे, शहरातील महात्मा गांधी मिशनचे एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब मध्ये ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ (James Webb Space Telescope)ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर आणि त्यांच्या टीमने अनेक दिवसांच्या मेहनतीतून ही प्रतिकृती तयार केली असून शहर तसेच मराठवाड्यातील विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी जेम्स वेबचे लाइव्ह प्रक्षेपण (Live Broadcast) पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आज थेट प्रक्षेपण पहायला मिळणार…
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’, युरोपियन स्पेस एजन्सी तसेच कॅनडा स्पेस एजन्सी यांच्या वतीने शुक्रवार दि. 25 डिसेंबर रोजी “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप” ही अत्याधुनिक अंतराळ दुर्बीण पृथ्वीवरून अंतराळात पाठवण्यात येणार आहे. अर्थातच या महत्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होता यावे या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील विज्ञान व खगोल प्रेमी नागरिकांसाठी महात्मा गांधी मिशनचे एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब तर्फे जेम्स वेब अंतराळ दुर्बीणीचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एमजीएम जेएनईसी परिसरातील आईनस्टाईन सभागृहात सायंकाळी 4 पासून हे प्रक्षेपण पहाता येईल. हा कार्यक्रम नि:शुल्क दाखवण्यात येणार आहे. यावेळेस विचारण्यात येणाऱ्या शंकांचे समाधान केले जाणार आहे.
हुबेहुब आरशाची प्रतिकृती आणि सेल्फी पॉइंट
विशेष म्हणजे, जेम्स वेब व हबल स्पेस टेलीस्कोप या दोन दुर्बीणीमध्ये वापरण्यात आलेल्या आरशांची मूळ आकाराची प्रतिकृती विज्ञान केंद्र परिसरात उभारण्यात आली असून आपल्याला यांच्या बाजूला उभे राहून फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. हा आरसा 16 फूट रुंद आणि 20 फूट उंच आकाराचा आहे. अशा प्रकारची ही आपल्या देशातील पहिलीच प्रतिकृती असल्याचा दावा संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला असून विद्यार्थ्यांना हा सेल्फी पॉइंट नक्की आवडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी प्राचार्य बी. एम पाटील, श्री. लाला राजपुत, डाॅ. समीना पठाण, निलेश हारदे, सौ. रुपाली औंधकर, शहरातील विज्ञान प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अशोक क्षीरसागर व योगेश साळी, सिध्देश औंधकर, हरिष केवारे, शिवम बुधे यांनी सहकार्य केले.
जेम्स वेब खगोल महोत्सवाची आज सुरुवात
शालेय विद्यार्थ्यांच्या खगोल वैज्ञानिक सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दि. 26 डिसें. (रविवार) रोजी पूर्व प्राथमिक ( इयत्ता 1 ली ते 4 थी ) विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंग भरण व चित्रकला तर प्राथमिक ( इयत्ता 5 वी ते 7 वी ) व माध्यमिक (इयत्ता 8 वी ते 10 वी) विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंधलेखन व “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप” पेपर मॉडेल कार्यशाळा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 26 डिसेंबर (रविवार) रोजी सायंकाळी साडेचार वाजता एमजीएम जेएनईसीच्या आईनस्टाईन हॉलमध्ये या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप महोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिल्या जातील, दुर्बिणीबद्दल पीपीटी द्वारे माहिती व ‘नासा’ कडून प्राप्त माहितीपट ही दाखविण्यात येणार आहे. या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप महोत्सवात सहभागी होण्यासाठी मोबाईल व्हाटसअप क्र. 9850080577 यावर पुर्वनोंदनी करणे आवश्यक आहे.
इतर बातम्या-