Nashik | नाशिकच्या स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा अपहार? अण्णासाहेब मोरे अडचणीत!!
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी धर्मदाय आयुक्तांकडून सदर प्रकरणाचा अहवाल मागवल्याची माहिती हाती आली आहे. हा अहवाल आल्यानंतर अण्णासाहेबांविरोधात गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबतचा निर्णय पोलीस घेतील. मात्र तक्रारदारांनी आर्थिक स्वार्था पोटी आरोप केल्याचा अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठचा दावा आहे.
नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्राचे (Swami Samarth Center) प्रमुख श्रीराम खंडेराव उर्फ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (Annasaheb More) यांच्यावर तब्बल 50 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील (Amar Patil) यांनी सदर आरोप करत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेमुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात खळबळ माजली आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. ही तक्रार करताना पाटील यांनी ऑडिट रिपोर्ट पुरावा म्हणून जोडला आहे. आता पोलीस अण्णा साहेबांविरोधात गुन्हा दाखल करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हजारोंच्या श्रद्धास्थानाला धक्का?
त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक प्रसिद्ध धर्मादाय संस्था आहे. देशभरातील भाविकांची संस्थेवर श्रद्धा आहे. श्रीराम खंडेराव ऊर्फ अण्णासाहेब हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अण्णासाहेब यांनी इतर सदस्यांशी संगनमत साधून 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वामी समर्थ केंद्र हा महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचा श्रद्धेचा विषय असून अण्णासाहेब यांचा शिष्यवर्गही मोठा आहे.
नेमकी तक्रार काय?
धर्मादाय संस्थेचा निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे कायद्याने बंधनकारक असते. परंतु स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्तांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने फौजदारी स्वरुपाचे कट-कारस्थान करून एक टोकी 44 लाख 93 हजार 560 रुपये बँकेत जमा न करता वेगवेगळ्या कारणासाठी वापरून अपहार केल्याचा दावा तक्ररादाराने केला आहे. तसेच धर्मदाय आयुक्तांचे नियम डावलून, विना टेंडर कोट्यवधींचा निधी लाटल्याचा आरोप अमर पाटील यांनी केला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी धर्मदाय आयुक्तांकडून सदर प्रकरणाचा अहवाल मागवल्याची माहिती हाती आली आहे. हा अहवाल आल्यानंतर अण्णासाहेबांविरोधात गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबतचा निर्णय पोलीस घेतील. मात्र तक्रारदारांनी आर्थिक स्वार्था पोटी आरोप केल्याचा अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठचा दावा आहे.