Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना निर्बंध वाढले; लग्नासाठी आता 50 वऱ्हाडी, जाणून घ्या नवे नियम…
लग्न सोहळ्याची जय्यत तयारी केलेल्या अनेक परिवाराचा नव्या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे. कारण अनेक जण शहरात जुने नियम लागू आहेत, असे समजून विवाह सोहळ्यांची जोरदार तयारी करत होते. मात्र, आता अचानक नियमात बदल करण्यात आले आहे.
नाशिकः अतिशय झपाट्याने वाढणारे कोरोना रुग्ण, ओमिक्रॉन विषाणूची भीती आणि सध्या नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ या साऱ्या धरतीवर उशिरा का होईना पोलीस आयुक्तांनी राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध नाशिकमध्ये लागू करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही काढण्यात आलेले आदेश नाशिक ग्रामीणमध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लागू केले होते. मात्र, शहरात पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ते उशिराच लागू केले होते.
अशी केली चालढकल
पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये 28 डिसेंबर रोजी निर्बंध लागू केले. विशेष म्हणजे या दिवशी सरकारने त्यापूर्वी लागू केलेल्या नियमात बदल करून नवे आदेश दिले. मात्र, नाशिकमध्ये जुनेच निर्बंध लागू होते. त्यानुसार विवाह सोहळ्याला 100 वऱ्हाडी उपस्थित रहात होते. लॉन्स, मंगल कार्यालयाच्या क्षमतेच्या 25 टक्के वा जास्तीजास्त 250 लोकांची उपस्थिती रहात होते. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठीही 250 लोकांच्या उपस्थितीला परवानगी होती. तर चित्रपटगृहे, हॉल, रेस्टॉरंट, नाट्यगृह या ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ग्राह्य धरण्यात आली होती. मात्र, या नियमात उशिरा का होईना बदल करण्यात आला आहे.
नवे नियम असे
पोलीस आयुक्तांनी तीन जानेवारी रोजी नाशिकमध्ये नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार आता मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी फक्त 50 वऱ्हाड्यांना परवानगी असणार आहे. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमाची उपस्थितीही 50 अशी करण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के उपस्थिती असेल. तर अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे.
अनेकांचा हिरमोड
लग्न सोहळ्याची जय्यत तयारी केलेल्या अनेक परिवाराचा नव्या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे. कारण अनेक जण शहरात जुने नियम लागू आहेत, असे समजून विवाह सोहळ्यांची जोरदार तयारी करत होते. मात्र, आता अचानक नियमात बदल करण्यात आले आहे. यापूर्वी सुविचार मंचच्या वतीने देणाऱ्या येणारा सुविचार गौरव सोहळा कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यात चित्रपट अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री पूजा सावंत या दोघांना गौरवण्यात येणार होते. मात्र, त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल, हे ध्यानात घेत हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
इतर बातम्याः
Nashik Corona|नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा धडाका; तर वाढत्या संसर्गाने पुन्हा धडकी
Nashik|नाशिकमध्ये सैनिकी वसतिगृहात नोकरभरती; कधीपर्यंत, कसा करावा अर्ज?