Nashik Corona|कोरोनाविरोधात लढा आमचा सुरू; 13 अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशासनाने काय केली तयारी?
अगोदर राजकीय नेत्यांना नियम पाळणे सक्तीचे केले पाहिजे. तरच इतर लोकही कोरोनाचे निर्बंध गांभीर्याने घेतील. अन्यथा येरे माझ्या मागल्या, हेच सुरू राहील, अशी भावना व्यक्त होत आहे.
नाशिकः कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता नाशिक जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सज्ज ठेवण्यात आली आहे. या कामासाठी एकूण 13 अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून कोविड नियंत्रण कक्षाची पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे.
काय आहे जबाबदारी?
कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रत्येकावर वेगळी जबाबदारी सोपवली आहे. उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, भीमराज दराडे, नितीन मुंडावरे, अरविंद नरसीकर, नीलेश श्रींगी, ज्योती कावरे, डॉ. आनंद पवार, नितीन गावंडे, सतीश खरे, किरण देशमुख, श्रीकृष्ण देशपांडे, डॉ. दुधेडिया, वासंती माळी या अधिकाऱ्यांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या दिमतीला मोठा फौजफाटा देण्यात आला आहे. कोविड नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडे लसीकरण नियंत्रण, कोविड सेंटर निर्मिती, कोविड मृतांच्या नातलगांना सानुग्रह अनुदान देणे, रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने योग्य ते नियोजन करणे आधी जबाबदाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोपवल्या आहेत. सध्या शहरातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांना तो घेणे सक्ती करणे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवणे हे मोठे आव्हान आहे.
असे प्रकार रोखावे लागतील
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. ओझरमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदाराने बैलगाडा शर्यत घेऊन हजारो लोकांची गर्दी जमा केली. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर येथेही हजारो जणांची गर्दी जमवून बैलगाडा शर्यत पार पडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा झाला. यावेळीही कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. हा गाफीलपणा येणाऱ्या काळात भोवण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अगोदर राजकीय नेत्यांना नियम पाळणे सक्तीचे केले पाहिजे. तरच इतर लोकही कोरोनाचे निर्बंध गांभीर्याने घेतली. अन्यथा येरे माझ्या मागल्या, हेच सुरू राहील.
इतर बातम्याः
Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!
Nashik Train| नाशिक रेल्वे मार्गावरच्या 10 गाड्या आज रद्द; प्रवाशांचे पुन्हा बेहाल!
16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याला नवे वळण; विभाग म्हणतो, प्रकरण निकाली, पण तक्रारदाराला माहितच नाही