नाशिकः नाशिककरांसाठी एक खूशखबर. आता नाशिकमध्ये स्वतः महापालिका 106 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन (Electric Charging Station) सुरू करणार आहे. त्यासाठी महापालिकेने एका खासगी कंपनीसोबत बीओटी तत्वावर ही केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे. या कामासाठी तज्ज्ञ सल्लागारही नियुक्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. खरे तर या स्टेशन उभारणीसाठी स्मार्ट सिटीकडे आलेल्या एका राजस्थान येथील कंपनीने उत्सुकता दाखवली होती. मात्र, कंपनीच्या अटी योग्य नसल्यामुळे आयुक्तांनी नकार कळवत पालिकेकडूनच असे स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केलीय. नाशिक महापालिने विविध निर्णय घेत राज्यभरात पर्यावरण स्नेही महापालिका ही वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याच धरतीवर प्रशासन एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे.
चार्जिंग स्टेशनची सक्ती
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी नगररचना विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता 25 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात येणार आहे. 51 पेक्षा अधिक घरे असतील तर त्या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सक्तीचे करण्यात आले आहेत. पूर्ण वाणिज्य क्षेत्र पाचशे चौरस मीटरपर्यंत असेल, तर दोन चार्जिंग स्टेशन आणि पाचशे चौरस मीटरपेक्षा जास्त असे तर चार चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात आली आहे.
21 डिसेंबरपासून अंमलबजावणी
नाशिक महापालिकेने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या नियमाची 21 डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम प्रस्ताव सादर करताना त्यात ही तरतूद आहे की नाही, हे पाहिले जात आहे. चार्जिंग स्टेशनची सोय नसल्यास त्या प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही. विशेष म्हणजे असा पर्यावस्नेही निर्णय घेणारी ही राज्यातली पहिलीच महापालिका ठरली आहे. या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
इलेक्ट्रिकल वाहन खरेदी
या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या केंद्र सरकार क्लीन एअर मिशन राबवत आहे. त्यातही महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणतेही नवीन वाहन खरेदी करताना महापालिका एक तर इलेक्ट्रिकल किंवा सीएनजी वाहन खरेदी करणार आहे.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली