सत्यजित तांबे यांचं मामा आणि वडिलांच्याच पाऊलावर पाऊल, सत्यजित तांबेही इतिहास घडवणार का ?
सत्यजित तांबे यांनीही मामा आणि वडिलांप्रमाणे अपक्ष उमेदवारी दाखल करून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहे, त्यामुळे मामा आणि वडिलांच्या पाऊलावरपाऊल ठेऊन सत्यजित तांबे इतिहास घडवणार का याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक : राज्यातील पाच ठिकाणी विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा ही नाशिकमधील निवडणुकीची होत आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रमुख पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नाहीये. तरी देखील नाशिकची निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात विशेषतः अपक्ष उमेदवार असलेल्या सत्यजित तांबे यांचीच जोरदार चर्चा होत आहे. नाट्यमय घडामोडी घडल्यानंतरही सत्यजित तांबे यांनी कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता निवडून येण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यामागे काही विशेष बाबी आहे. अपक्ष उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरलेले सत्यजित तांबे हे कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार असलेले सुधीर तांबे यांचे ते चिरंजीव आहे. त्यात सत्यजित तांबे हे गेली अनेक वर्षे युवक कॉंग्रेसचे कामही करत आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्जावरून नाशिकची निवडणूक अधिक चर्चेत आली आहे. पण याशिवाय आणखी अशी एक बाब आहे जीची चर्चा जरा उशिराने सुरू झाली आहे.
सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे यांनीही त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अपक्ष उमेदवारीपासूनच सुरू केली आहे.
1985 मध्ये बाळासाहेब थोरात यांचे वडील स्व. भाऊसाहेब थोरात कॉंग्रेसमध्ये होते, तरीही बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली होती.
त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढून ती जिंकून दाखवली होती, त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने त्यांची दखल घेतली होती.
बाळासाहेब थोरात त्यानंतर आठ वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहे. याशिवाय त्यांचे मेव्हणे असलेले सुधीर तांबे यांनाही 2009 मध्ये कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली होती.
त्यानंतर सुधीर तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तांबे यांची दखल पक्षाने घेतली होती, त्यानंतर दोनदा त्यांना उमेदवारी दिली होती आणि दोन्ही वेळेस तांबे निवडून आले होते.
त्यात आता सत्यजित तांबे यांनीही मामा आणि वडिलांप्रमाणे अपक्ष उमेदवारी दाखल करून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहे, त्यामुळे मामा आणि वडिलांच्या पाऊलावरपाऊल ठेऊन सत्यजित तांबे इतिहास घडवणार का याकडे लक्ष लागून आहे.