साधूसंतही लोकसभेच्या आखाड्यात, नाशिकच्या महाराजांची 8 लोकसभा जागा लढण्याची घोषणा; कोणते मतदारसंघ लढणार?
Loksabha Election 2024 | जय बाबाजी भक्त परिवाराचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते स्वत: नाशिक लोकसभा मतदार संघातून लढवणार आहे. तसेच आठ ठिकाणी उमेदवार देणार आहेत.
उमेश पारीक, चांदवड, नाशिक | दि. 28 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुका आता काही दिवसांनी जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. परंतु काही ठिकाणी साधूसंतांकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु झाली आहे. जय बाबाजी भक्त परिवाराचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते स्वत: नाशिक लोकसभा मतदार संघातून लढवणार आहे. तसेच राज्यातील आठ ठिकाणी उमेदवार देणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे भाजपसमोर अडचण होणार आहे.
चांदवडमधील बैठकीत महत्वाचा निर्णय
‘लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध’, राजकारणाचा हे ब्रीद घेवून नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात आपण उतरणार आहोत. नाशिक, दिंडोरीसह अन्य आठ लोकसभा मतदार संघात जय बाबाजी भक्त परिवार उमेदवार देणार आहे, असे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी सांगितले.आम्ही हिंदू धर्माचा भगवा परिधान केलेला आहे केवळ भगवा ध्वज खांद्यावर घेतला नसल्याचेही त्यांनी हिंदुत्ववादी पक्षांचे नाव न घेता टीका केली.
बैठकीस प्रचारकांची मोठी उपस्थिती
नाशिक, दिंडोरी, धुळे, शिर्डी, छ.संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यादेवी नगर आदी जय बाबाजी भक्त परिवाराच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख प्रचारकांची बैठक चांदवडमध्ये पार पडली. यावेळी शांतीगिरी महाराज बोलत होते. शांतीगिरी महाराज यांच्या या भूमिकेला उपस्थित जय बाबाजी भक्त परिवाराने दोन्ही हात उंचावून पाठिंबा दिला. नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी बाबा जैसा हो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या बैठकीस प्रचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीत नाशिकच्या जागेवर भाजपचा दावा
मुंबईत महायुतीची जागा वाटपावर चर्चा झाली. त्यावेळी नाशिकच्या जागेवर भाजप नेते दिनकर पाटील यांनी दावा केला. नाशिकची जागा भाजपला मिळावी, अशी सर्वांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाची नाशिकमध्ये मोठी ताकद आहे. तसेच गेल्या 10 वर्षात हेमंत गोडसे यांनी कामच केले नाही. गोडसे यांना भाजपने निवडून आणलं, आता ते निवडून येणार नाहीत, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.