Nashik | सटी सहा महिन्यांनी उगवलेल्या शिवसेना नगरसेवकाला नागरिकांनी पिटाळले; नेमके काय घडले?
नाशिकमध्ये अजून प्रारूप आराखडा अंतिम झालेला नसताना, तिकीट मिळाले नसताना चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण प्रचारासाठी मतदारांच्या दारोदार जात उंबरे झिजवत आहेत. मात्र, एका शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक महाशयांना असे करणे चांगलेच महागात पडले.
नाशिकः कडाक्याची थंडी आणि नीचांकी पातळीवर पोहचलेल्या तापमानातही नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीचे वारे अतिशय जोरात वाहताना दिसत आहेत. त्यामुळेच अजून प्रारूप आराखडा अंतिम झालेला नसताना, तिकीट मिळाले नसताना चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण प्रचारासाठी मतदारांच्या दारोदार जात उंबरे झिजवत आहेत. मात्र, एका शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक महाशयांना असे करणे चांगलेच महागात पडले. त्यांनी प्रभाग क्रमांक 27 मधील चुंचाळे घरकुल योजनेत पाय ठेवला. तेव्हा नागरिकांनी अशी काही प्रश्नांची सरबत्ती केली की, त्यांना अक्षरशः काढता पाय घेण्याची नामुश्की ओढावली.
प्रकरण नेमके काय?
नाशिकमधील प्रभाग क्रमांक 27 मध्ये चंद्रकांत खाडे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 27 मधील चुंचाळे घरकुल योजनेत दवाखान्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेची पाहणी केली. येथे तात्पुरत्या स्वरुपात दवाखाना सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. तसा मनोदयही त्यांनी या पाहणीत व्यक्त केला. मात्र, बराच वेळ नगरसेवकांचे म्हणणे ऐकुण घेणाऱ्या नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी खाडे यांच्यावर एकामागून एक प्रश्नांच्या फैरी झाडल्या. निवडणूक होऊन साडेचार वर्षे झाले, तुम्ही इतके दिवस होतात कुठे? दवाखान्याचे आश्वासन तुम्ही चाडेचार वर्षांपूर्वी दिले. त्यांनंतर गायबच का झालात? निवडून आले म्हणजे तुमचे काम संपले का? साडेचार वर्षे दवाखान्याच्या आश्वासनाची आठवण का आली नाही, आताच तुम्हाला दवाखान्याची गरज काय, या प्रश्नांची उत्तरे मात्र खाडे यांच्याकडे नव्हती. त्यामुळे ते शांतपणे ऐकुण घेत होते.
खाडेंचे अजब तर्कट
नागरिकांनी इतका संताप व्यक्त केला. मात्र, त्यानंतरही शिवसेना नगरसेवक खाडे यांनी आपले अजब तर्कट मांडले. या प्रभागात चार नगरसेवक आहेत. राकेश दोंदे, चंद्रकांत खाडे, कावेरी घुगे आणि किरण दराडे. आम्हा साऱ्यांचे कोणत्या भागात काम करायचे हे ठरले होते. त्यामुळे इकडे आलो नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले. मात्र, त्यानंतर नागरिकांचा संतापाचा पारा वाढला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला आता काम आठवले का, असा सवाल त्यांनी केला. अखेर आपला जास्त तमाशा नको म्हणून खाडे यांच्यावर काढता पाय घेण्याची नामुष्की ओढावली.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!
Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी