चर्चा तर होणारचः नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटली, इच्छुकांमध्ये भीतीचे काहूर; आयुक्तांना पत्र, कोर्टात जायचा इशारा
सिडकोतील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या घरात बसून प्रभागरचना तयार केली जात आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेवकाने केला होता. त्याला सध्या राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चेमुळे दुजोरा मिळत आहे. विशेष म्हणजे बहुतांश जणांना प्रभागरचना कशी आहे, याची माहिती आहे.
नाशिकः नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटल्याने नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये भीतीचे काहूर उठले आहे. काही प्रस्थापितांनी ठराविक आणि सोयीच्या भागात दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे या चर्चेने जोर धरला असून, सातपूर येथील विभाग संघटक प्रशांत दैतकार-पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाध यांना पत्र दिले आहे. सोबतच याप्रकरणी न्यायालायत जाण्याचा इशारा दिला आहे.
नेमके झाले काय?
अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने प्रचंड जोर लावलेला असताना, या पक्षांच्या नेत्यांचे शहरात दौऱ्यावर दौरे सुरू असताना, आता चक्क महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा दावा होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ही सारी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक 11 मधील कामगारनगर हा परिसर महात्मानगरला जोडण्यात आल्याचे समजते. असे प्रकार इतर ठिकाणीही झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संताप आहे.
अशी झाली रचना
महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागले.
सोपस्कार उरकले
प्रभागरचना तयार करताना प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली. आता राज्य निवडणूक आयोग या प्रभागरचनेला अंतिम रूप देणार असल्याचे समजते. त्यानंतर ती जाहीर करण्यात येईल. मात्र, सध्या प्रभागरचना फुटल्याचा जो दावा होतोय, त्यानंतर ही छाननी प्रक्रिया फक्त दिखावू होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.
तो नगरसेवक कोण?
सिडकोतील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या घरात बसून प्रभागरचना तयार केली जात आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेवकाने केला होता. त्याला सध्या राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चेमुळे दुजोरा मिळत आहे. विशेष म्हणजे बहुतांश जणांना प्रभागरचना कशी आहे, याची माहिती आहे. कोणाचा पत्ता कट केला, कोणाचा भाग कसा वगळला, याची चवीने चर्चा सुरू आहे. त्यात विरोधी पक्षाचा काटा काढण्याबरोबर काही स्वकियांचे पत्ते कसे कट केले, त्यासाठी कोणी कशी मदत केली, इथवर खमंग चर्चा सुरू आहे.
इतर बातम्याः
Video: कठीण आहे काँग्रेसचं? स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला, सोनिया गांधीही बघत राहिल्या