Nashik Election| राडा टाळण्यासाठी विकेंद्रीकरणाचा रामबाण…महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बरंच काही घडतंय!
प्रत्येक राजकीय पक्षाने दृढ निर्धार केला, तर आपल्या पक्षात चांगली राजकीय संस्कृती रुजवता येते. याचाच प्रयोग सध्या नाशिकमध्ये सुरूय.
नाशिकः महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र निवनिर्माण सेना प्रमुख पक्षांनी नाशिकमध्ये आत्तापासूनच फिल्डिंग लावलीय. अनेक जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्यालाच तिकीट मिळणार म्हणत प्रचारही सुरू केलाय. एकाच पक्षातून अनेक जण निवडणूक लढवायला इच्छुक असतात. प्रत्येकाला तिकीट मिळेल याची खात्री नसते. अनेकदा यात चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्यायही होतो. मात्र, पक्षश्रेष्ठी नामक व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी असल्याने ते त्यांना दिसत नाही. मात्र, या कार्यपद्धतीतही आता सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे यामुळे तिकीट वाटपाचे वाद टाळण्यासाठी एक जालीम इलाज सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलाय. जाणून घेऊयात काय ते…
भाजपपासून सुरुवात…
नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आली. मात्र, सत्तेमुळेच अंतर्गत यादवी माजली. प्रत्येकाला वाटा हवा होता. प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजायचा. यावर उपाय म्हणून पक्षाने सामूहिक निर्णयाचे तत्व स्वीकारले. हे निर्णय घेण्यासाठी एका सुकाणू समितीची स्थापना केली. त्यात आजी-माजी आमदार, महापौर आणि ज्येष्ठ पदाधिकारी घेतले. त्यामुळे कुठलाही निर्णय एककल्ली होणे टळू लागले. त्यात आता निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे शहर प्रभारी जयकुमार रावल यानी विभानिहाय समित्या घोषित केल्या. या समित्याच महापालिकेत कोणाला उमेदवारी द्यायची, हे शिफारस करणार आहेत. त्यामुळे तिकीट वाटपाची नाराजीही बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे.
शिवसेनेनीही कित्ता गिरवला…
भाजपचा हाच कित्ता शिवसेनेनीही गिरवला आहे. यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकात शिवसेनेत तिकीट वाटपावरून चांगलीच जुंपली होती. अंतर्गत वादाने पक्ष ढवळून निघाला होता. त्यानंतर महानगरप्रमुखपद आले. त्यावर सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाली. त्यानंतरही हे मतभेद सुरूच होते. त्यामुळे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत यांनी समितची घोषणा केली. त्यात जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांचा समावेश केला. त्यामुळे वाद काही अंशी कमी झाले. महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपातही ही समिती कार्यरत राहणार आहे.
काँग्रेसने री ओढली…
भाजप, शिवसेना आणि त्यापाठोपाठ आता जिल्ह्यात काँग्रेसने सत्तेचे विकेंद्रीकरण सुरू केले आहे. त्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय निरीक्षक घोषित केले आहेत. सिडको विभागासाठी स्वप्नील पाटील, सातपूर विभागासाठी सुरेश मारू, पंचवटी संतोष नाथ, नाशकरोड विभागासाठी वसंत ठाकूर, मध्य नाशिकसाठी रईस शेख यांच्यावर जबाबदारी सोपण्यात आली आहे. यामुळे पक्षातील धुसफूस, भांडणे आणि नाराजी कमी होती, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकंदर सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसलीय. हे सुरू राहणारच. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाने दृढ निर्धार केला, तर आपल्या पक्षात चांगली राजकीय संस्कृती रुजवता येते. याला इथून सुरुवात व्हावी, हीच अपेक्षा.
इतर बातम्याः
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली, राऊतांचं थेट आव्हान