महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पक्षांतराच्या उलथापालथी…माजी महापौर दशरथ पाटलांचे पुत्र शिवसेनेत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्तुळातील म्हणून दशरथ पाटील यांची ओळख आहे. महापालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आली. त्यावेळी 2002 मध्ये दशरथ पाटील यांना महापौर पदाची संधी मिळाली.
नाशिकः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पक्षांतराच्या मोठ्या राजकीय उलथापालथी होताना दिसत आहेत. शिवसेनेचे माजी महापौर म्हणून कार्यकाळ गाजवणारे दशरथ पाटील आता पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सध्या दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील शिवसेनेत दाखल झालेत. दशरथ पाटील सुद्धा ऐनवेळेस पुन्हा एकदा प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे बळ वाढणार आहे.
बाळासाहेबांचे निकटवर्तीय
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्तुळातील म्हणून दशरथ पाटील यांची ओळख आहे. महापालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आली. त्यावेळी 2002 मध्ये दशरथ पाटील यांना महापौर पदाची संधी मिळाली. पाटील शिवसेनेचे दुसरे महापौर. त्यांनी पाच वर्षांची कारकीर्द गाजवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देविदास पिंगळे यांच्याविरुद्ध निवडणूक लवढवली. त्यावेळी शिवसेनेतील अनेकांनी त्यांच्याविरोधात काम केले. मात्र, तरीही पाटील यांनी तगडी लढत दिली, पण पराभव स्वीकारावा लागला. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीही ते उभे राहिले. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (कै.) वसंत पवार यांनी त्यांचा पराभव केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश
शिवसेनेतील अनेकांनी दशरथ पाटील यांच्याविरोधात काम केले. त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ही खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली. पक्षातील वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, तिथेही ते फार काळ टिकले नाहीत. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसे पत्रही त्यांना लिहिले होते. त्यानंतरच दशरथ पाटील हे शिवसेनेत येणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. आता त्यांचे पुत्र प्रेम हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. लवकरच दशरथ पाटीलही प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
पुढे काय होणार?
भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील हे प्रेम यांचे चुलते. आता प्रेम त्यांच्या प्रभागात निवडणूक लढवणार की, त्यांचेच नातेवाईक असलेले शिवसेनेचे गटनेते विलास शिंदेंच्या प्रभागातून त्यांच्या पॅनेलमध्ये उभे राहणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र, तूर्तास तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माझा मुलगा स्वगृही शिवसेनेत गेला आहे. माझ्या प्रवेशाचे सध्या काही नाही. येणाऱ्या काळात त्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया दशरथ पाटील यांनी दिली आहे.
इतर बातम्याः