Nashik Election | नाशिक नगरपंचायतीच्या 8 जागांसाठी आज मतदान; 20 उमेदवार मैदानात !
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 जागांसाठी आज मंगळवारी मतदान होणार असून, दुसऱ्या टप्यात 20 उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीचा निकाल बुधवारी 19 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे देवळा येथे 4, निफाड 3, कळवण आणि दिंडोरी येथे प्रत्येक 2 जागांवर अशा एकूण 11 जागांची निवड स्थगित करून येथे सोडत काढून पुन्हा प्रक्रिया घेण्यात आली. या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.
पहिल्या टप्प्यात 292 उमेदवार रिंगणात
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मंगळवार, 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे. दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे.
उद्या लागणार निकाल
पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे. या सर्व ठिकाणचा निकाल 19 जानेवारी रोजी लागणार आहे.
इतर बातम्याः
Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?
Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?