माहीम नंतर नाशिकमध्ये पालिका बुलडोझर चालवणार, आनंदवली दर्गेला पालिका प्रशासनाकडून नोटिस, नेमका इशारा काय?
माहीमच्या स्थानिक प्रशासनानंतर नाशिकमधील पालिका प्रशासन देखील कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आनंदवली येथील दर्गेसह शहारातील धार्मिक स्थळांची आयुक्त पाहणी करणार आहे.
नाशिक : गुढी पाडव्याला शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील दर्गेबाबत काही व्हिडिओ दाखवत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लागलीच कारवाई झाल्यानंतर राज्यातील बऱ्याच ठिकाणी दर्गेच्या संदर्भात जिथं जिथं अतिक्रमण आहे तिथे कारवाईची मागणी केली होती. सांगली, पुणे आणि नाशिकमध्ये याबाबत मागणी होऊ लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत नाशिक महानगर पालिकेला इशारा दिला होता. त्यामध्ये आनंदवली येथील दर्गेच्या ठिकाणी अतिक्रमण असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत.
नाशिकमधील आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिर आहे. त्या मंदिराच्या पुढील बाजूला आनंदवली दर्गाह आहे. त्याच दर्गेला नाशिक महानगर पालिकेच्या वतीने नोटिस बजावण्यात आली आहे. यामध्ये अतिक्रमण असल्याचा मुद्दा पालिकेने अधोरेखित केला आहे.
गुढी पाडव्याला राज ठाकरे यांचा मेळावा पार पडत असतांना नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटना यांनी हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दसऱ्या दिवशी माहीम मध्ये पालिकेकडून कारवाई होत असतांना हिंदुत्ववादी संघटना यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते काढण्यात यावे अशी मागणी केली जात होती. त्यामध्ये अनेकांनी पालिकेला इशारा देत कारवाईची मागणी केली होती. त्यामध्ये पालिकेने स्वतः लक्ष घातले असून कारवाई सुरू केली आहे.
नाशिकच्या आनंदवली दर्गेच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाच्या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. सात दिवसाच्या आत खुलासा करावा असेही नोटिस मध्ये म्हंटले आहे.
यामध्ये दर्गेच्या व्यवस्थापाकडून कुठेलही नोटिस न आल्यास किंवा सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका चालवणार बुलडोझर चालवण्याच्या भूमिकेत आहे. यामध्ये अतिक्रमण असल्याचे स्पष्ट करत कारवाईचा इशारा मनपाने दिला आहे.
या कारवाई दरम्यान नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त स्वतः शहरात फिरून कुठे कुठे अतिक्रमण झाले आहे. याशिवाय धार्मिक स्थळे कुठे आहेत. त्याची देखील पाहणी करत अतिक्रमण झाले आहे की नाही याची पाहणी होणार असल्याने अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांशी ठिकाणी कारवाईची मागणी केली जात होती. त्यामध्ये नाशिक शहरात देखील कारवाईच्या हालचाली वाढल्या असू पुढील काळात काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.