नाशिककरांना 2 तासांत गाठता येणार सुरत, ग्रीनफील्ड महामार्गाने जिल्ह्याचे रूपडे बदलणार!
ग्रीनफील्ड महामार्गाचे भूसंपादन 2022 पर्यंत केले जाणार आहे. पुढील तीन वर्षांत रस्ता तयार असेल. नाशिक जिल्ह्यात त्यासाठी 996 हेक्टर जमीन संपादित केली जाईल.
नाशिकः नाशिक खरोखर कात टाकताना दिसते आहे. राज्यात मुंबई, पुण्यानंतर कोणीही नाशिकलाच प्राधान्य देते. इथले सौंदर्य, वातावरण आणि वाहतुकीची अतिशय चांगली सुविधा. त्यामुळे या शहराचा उद्योगनगरी म्हणूनही वेगाने विकास होताना दिसतो आहे. आता समृद्धी महामार्गानंतर केंद्र सरकारच्या भारतमालांतर्गतचा सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जिल्ह्याचे रूपडे बदलणार आहे. सोबत नाशिककरांना फक्त दोन तासांत सुरत गाठता येणार आहे. जाणून घेऊयात हा ग्रीनफील्ड महामार्ग कसा असणार आहे ते…
असा आहे प्रकल्प
ग्रीनफील्ड महामार्गाचे भूसंपादन 2022 पर्यंत केले जाणार आहे. पुढील तीन वर्षांत रस्ता तयार असेल. नाशिक जिल्ह्यात त्यासाठी 996 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. या मार्गाचे नाशिक जिल्ह्यातील अंतर हे 122 किलोमीटर असेल. जिल्ह्यातील एकूण 69 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वाधिक तेवीस गावांचा समावेश आहे.
609 गावांमधून जाणार
नाशिक जिल्ह्यातील 609 गावांमधून हा ग्रीनफील्ड महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 996 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी 2024 मध्ये हा महामार्ग तयार होणार आहे. या मार्गाचे अनेक फायदे आहेत. यामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही शहरे जोडली जातील. सोबतच सुरत-चेन्नई हे 1600 किमीचे अंतर 1250 किमीवर येईल. त्यातही म्हणजे नाशिक-सुरत अंतर फक्त 176 किमी आहे. त्यामुळे नाशिककर एकदम सुसाट दोन तासांत सुरत गाठतील.
नाशिक-सोलापूर जवळ
राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे हा महामार्ग प्रवेश करेल. अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे या महामार्गाचे राज्यातील शेवट असेल. हा महामार्ग सिन्नरमधील वावीत समृद्धी एक्स्प्रेसला ओलांडणार आहे. त्यासाठी सोलापूर, नाशिक, नगर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी होणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर हे अंतर चक्क 50 किलोमीटरने कमी होणार आहे.
या तालुक्यातून जाणार
नाशिक तालुक्यातील आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव येथून हा मार्ग जाईल. निफाड तालुक्यातील चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी गावातून हा महामार्ग जाईल. सुरगाणा तालुक्यातील बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ गावातून हा मार्ग जाईल.
दिंडोरीतली 23 गावे
दिंडोरी तालुक्यातील तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहूर आदी गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. पेठ तालुक्यातील पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव येथून हा महामार्ग जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी या गावातून हा महामार्ग जाणार आहे.
इतर बातम्याः
Omicronचे भयः नाशिकमध्ये पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे
ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलनाचे होणार काय, मुख्य मंडपाची आसनक्षमता 14 हजार, बाका प्रसंग उद्भवला…!