नाशिकः ऐन महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर विधिमंडळात गाजलेल्या आणि नाशिकमध्ये आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित 100 कोटींच्या टीडीआर घोटाळा (TDRscam) प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन अखेर गोपनीय अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे. चौकशी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी ही चौकशी पूर्ण केली आहे. याप्रकरणी दोषींवर काय कारवाई होणार आणि अहवालात नेमके दडलेय काय, याची खुसखुशीत चर्चा सुरू झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक महापालिकेने 15,630 चौरस मीटर क्षेत्राचा टीडीआर घेतला होता. त्यासाठी सिन्नर फाटा येथे असलेली जागा नाशिकरोडच्या बिटको चौकात असल्याचे दाखवली गेली. या जागेचा सरकारी भाव 6, 900 रुपये होता. मात्र, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हाच दर 25,100 प्रतिचौरस मीटर लावण्यात आला. त्यातून 100 कोटींचा ‘टीडीआर’ पदरात पाडून घेतला. या घोटाळ्याप्रकरणी अॅड. शिवाजी सहाणे, सलीम शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर नगरविकास विभागाकडे तक्रार करून त्यांच्यामार्फत चौकशी लावली होती. विशेष म्हणजे महापालिकेने प्रशासन उपायुक्तांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी केली. तसेच शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी पुन्हा याबाबत तक्रार केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते.
विधिमंडळात तारांकित प्रश्न
विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी नाशिक महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याबाबत तारांकित प्रश्न विचारला. त्यानंतर महापालिकेचा टीडीआर कोटींचा घोटाळा पुन्हा चर्चेत आला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती विधिमंडळाला दिली. नंतर विधिमंडळ सचिवालय आणि नगरविकास विभागाने महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर अखेर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेत चौकशी अहवाल तयार करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना दिल्या होत्या.
4 आठवड्यात अहवाल
बहुचर्चित टीडीआर घोटाळाप्रकरणी विधिमंडळाने चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी याप्रकरणाचा गोपनीय अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला आहे. यावर काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे. मात्र, टीडीआर घोटाळ्याची रक्कम अव्वाच्या सव्वा आहे. यामागचे सूत्रधारही मोठेच असतील. त्यांना पाठिशी घालण्यासाठीच ही चौकशी प्रलंबित ठेवली होती का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
निवडणुकीत गाजणार
नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीत टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाची राळ उठेल. सध्या महापालिकेतील सत्तेत भाजप आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिवसेना. विशेष म्हणजे या घोटाळ्याचा तपास करावा, अशी मागणी सुरुवातीपासूनच शिवसेनेने लावून धरलीय. त्यात आता चौकशी सुरू झालीय. निवडणुकीपूर्वी घोटाळ्यातील सूत्रधारांची नावे समोर आली आणि कारवाई झाली, तर निवडणुकीतही यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.
Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?