नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बसची दुचाकींना धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
त्र्यंबकेश्वर देवदर्शनासाठी काही भाविक खाजगी बसने आले होते. देव दर्शन झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या दिशेने येत असतानाच अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
नाशिक : त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन नाशिककडे चाललेल्या बसला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. बसचा टायर फुटल्याने बस बेलगाव ढगाजवळ एका झाडावर आदळली. यावेळी अनियंत्रित झालेल्या बसने दोन दुचाकीस्वारांनाही उडवले. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले.
देवदर्शनाहून परतत होती खाजगी बस
सदर खाजगी बसमधील सर्व प्रवाशी त्र्यंबकेश्वरला देवदर्शनासाठी गेले होते. देव दर्शन करुन नाशिकच्या दिशेने परतत असताना बेलगाव ढगाजवळ एस्पालिअर स्कूलजवळ बसचे टायर फुटले. यामुळे बस नियंत्रित झाली. यानंतर बस लेन तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. यावेळी नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक देत बस झाडावर आदळली.
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उचारासाठी नेण्यात आले. बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
शिर्डीत बसच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी
कोपरगाव बस स्थानकात एसटी बसने एका वृद्धला धडक दिल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत सदर वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. धडकेत त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. विठ्ठल भुजंग कांबळे असे जखमी वृद्ध इसमाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.