‘…तर सर्व महाराष्ट्राच्या कपाळावर आठ्या आल्या’, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे लासलगावात जावून नेमकं काय म्हणाले?
"आमचे गुऱ्हाळ चालायचे तेव्हापासून माझा लासलगावशी संबंध आहे. राजकारणात अनेक मित्र आहेत. राजकीय मत-मतांतरे, विचार काही असेल तरी वैयक्तिक प्रेम जपण्याचे काम करतो", असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यानंतर छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात लासलगाव येथे माणिकराव कोकाटे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला माणिकराव कोकाटे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच वक्तव्यात नाशिकमधील राजकीय परिस्थिवर भाष्य केलं. “लासलगाव सत्कार घ्यायचा म्हटलं तर सर्व महाराष्ट्राच्या कपाळावर आठ्ठ्या आल्या. माझ्या दृष्टीने मर्यादा नाही. लासालगवशी माझा संबंध वर्षानुवर्षे आहे. आमचे गुऱ्हाळ चालायचे तेव्हापासून माझा लासलगावशी संबंध आहे. राजकारणात अनेक मित्र आहेत. राजकीय मत-मतांतरे, विचार काही असेल तरी वैयक्तिक प्रेम जपण्याचे काम करतो”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
“पक्षाचे नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतलं. आज अशा खात्याचा मंत्री केलं, आता दिवसरात्र काम करायचे आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला संवेदनशील खाते दिलं आहे”, अशी भावना माणिकराव कोकाटे यांनी मांडली. “शेतकरी 75 टक्के आहे. शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्याच्यासाठी काम करावे लागणार आहे. अनेक विषय आहेत, यावर निर्णय घ्यावे लागणार आहे. वेळोवेळी उपस्थित निर्माण होणाऱ्या समस्यांवर मार्ग काढावा लागेल. उद्या काय होईल सांगता येत नाही. मात्र त्यादृष्टीने उपाययोजना कराव्या लागतील”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
“शेतकरी हा देशाचा कणा आहे. अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे केंद्राशी चर्चा करून निर्णय घ्यावे लागतील. मी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. मात्र लवकरच कामकाजाला सुरुवात करेन. शेतकरी केंद्रस्थानी मानून काम करण्यावर भर देणार. सध्या कांद्यासह सर्वच पिकात अडचणी आहेत. मी ही शेतकरी आहे, शेतात काम केलं आहे. पुढे राजकीय जीवनात काम केलं. अनेक पक्षात काम केलं. मतदारसंघाच्या विकासासाठी काम केलं”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
‘माझा संघर्ष चालूच’
“राज्य सरकारने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ती पार करण्यासाठी प्रयत्न करेन. माझा संघर्ष चालूच आहे. आता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करू. केंद्रीय कृषीमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांना शेतकऱ्यांच्या संबंधी अनुभव आहे. महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले”, असंही माणिकराव कोकाटे म्हणाले.
‘लोकांसाठी काम केले तर माणसं संधी देतात’
“तुमचा मंत्री तुमच्या घरातला आहे. माझा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यात कुठलाही भेदभाव ठेवणार नाही. मी 5 वेळा निवडून आलो. हे सोपे नाही. राजकरण सुरूच राहणार आहे. लोकांसाठी काम केले तर माणसं संधी देतात. अनेक लोक सत्काराला येतात. यापूर्वीही मंत्री झाले. मात्र, अनेक मंत्री पाहिले तर आम्हला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. पण मला तुमच्यापर्यंत सहज पोहचता येतं. मला सुरक्षा नको. एकच गाडी पाहिजे, त्याला सायरन नको. मी कोणाचे वाईट केले नाही तर कोणी कशाला अमचे वाईट करेल? सामान्य जीवन जगणे हा माझा स्वभाव आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठेवण्यासाठी प्रयत्न करेन”, असं आश्वासन माणिकराव कोकाटे यांनी दिलं.