Ajit Pawar | शरद पवार खरंच हुकूमशाह वाटतात? अजित पवार यांची निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 07, 2023 | 9:33 PM

केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. या सुनावणीवर अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

Ajit Pawar | शरद पवार खरंच हुकूमशाह वाटतात? अजित पवार यांची निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया
Follow us on

चंदन पुजाधिकारी, Tv9 मराठी, नाशिक | 7 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अजित पवार यांच्या गटाने आपल्या युक्तिवादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार हे पक्षात हुकूमशाह सारखे वागतात. ते आपली मनमानी करतात. पक्षांतर्गत निवडणुका होत नाही. हे पक्षाच्या घटनेला धरुन नाही. शरद पवार परस्पर स्वाक्षरी करुन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करतात, असा आरोप अजित पवार गटाकडून युक्तिवादात करण्यात आला.

अजित पवार गटाने केलेल्या युक्तिवादावर शरद पवार यांच्या गटाने आक्षेप नोंदवला आहे. अजित पवार गटाचा हा युक्तिवाद ऐकून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी अजित पवार गटावर नाराजी व्यक्त केलीय. अजित पवार गट एकीकडे शरद पवार यांना विठ्ठल बोलत होते आणि आता त्याच विठ्ठलाला हे हुकूमशाह बोलत आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड भावूक झाले. अजित पवार गटाच्या आरोपांवर आमदार रोहित पवार यांनीदेखील हे अशोभनीय आहे, असं मत मांडलंय.

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर तसेच अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांनंतर ते आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. ते आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या आजच्या भाषणात निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण अखेर पत्रकार परिषदेत त्यांना या सुनावणीवर उत्तर द्यावं लागलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“कोर्टामध्ये केस असेल तर आपला वकील आपली भूमिका मांडतो. आपण वकील नेमतो आणि त्यांना सांगतो की, आपली बाजू त्या ठिकाणी मांडा. आम्ही तर सगळे महाराष्ट्रात आहोत. आम्ही कुणीच निवडणूक आयोगात गेलो नाहीत. निवडणूक आयोगात जेव्हा पक्षासंदर्भात सुनावणी होते आणि बोलावलं जातं त्यावेळेस त्यांचे वकील तिथे भूमिका मांडतात. हे फॅक्ट आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

“आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पद कुणाला द्यायचं याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. पुढे आणखी चांगल्या गोष्टी होतील”, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केली. दरम्यान, अजित पवार यांच्या आजच्या कार्यक्रमादरम्यान बॅनरवर दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतरावर चव्हाण यांचे फोटो बघायला मिळाले. यावरुन रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.