मला पैठणीचं जॅकेट घातलं, बायको म्हणेल लग्नात… अजितदादांची मिश्किल फटकेबाजी
"मला पैठणीचं जॅकेट घातले आहे. बायको म्हणेल लग्नात नाही घातले आणि आता घातले. पोरं लग्नाला आली आणि मी जॅकेट घालतोय", अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. ते येवल्यातील कार्यक्रमात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर येवल्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांना पैठणी जॅकेट घालण्यात आले. ते घालून उपमुखमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. “मला पैठणीचं जॅकेट घातले आहे. बायको म्हणेल लग्नात नाही घातले आणि आता घातले. पोरं लग्नाला आली आणि मी जॅकेट घालतोय”, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. “नाशिकमध्ये साडेतीन शक्तिपीठपैकी एक शक्तीपीठ आहे. मी देवीला वंदन करतो. येवल्याला बनारस बोलतात. आपल्याला इतिहास आहे. महराजांच्या काळापासून येवलेवाडी स्थापन केली, असे मानले जाते. वीणकरांनी येवल्याचे भविष्य घडविलं म्हणून मी त्यांना सॅल्यूट करतो. रेशीमला पैठणी नाव मिळाले. या येवल्याला मंत्री छगन भुजबळ यांचं नेतृत्व मिळालं आणि या ऐवल्याला गती मिळाली”, असं अजित पवार म्हणाले.
“देवदास सिनेमात माधुरी आणि ऐश्वर्याने घातलेली साडी ह्याच येवल्याची आहे. श्रीदेवीला 9 लाख रुपयांची पैठणी दिली. प्रेम जर करायचं म्हंटल तर येवलेकर काय करू शकतात हे उदाहरण आहे. टीव्हीमध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि त्यात पैठणी दिली जाते. किती महिलांचा उत्साह असतो. राजकीय लोकही हा खेळ घेऊ लागले आहेत. सरोजच्या मतदारसंघात हेच सुरु आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.
‘पैठणी निवडणुकीतही आली’
“अलीकडे पैठणी निवडणुकीतही आली आहे. पैठणी जगप्रसिद्ध होऊ लागली आहे. पण ह्यात आणखी काम करायचं. महाराष्ट्राच्या इतिहासात विणकर समाजाचे मोठे नाव आहे. त्यांनी कला जोपासली आहे. ह्या विणकर समाजाचे देशात मोठे योगदान आहे. मागच्या काही वर्षापासून यांत्रिकरणामुळे विणकर समाज बाजूला जात आहे. पण त्यातही ते पुढे आहे. येवल्यात हातमाग आणि मालेगावात यांत्रिकरित्या”, असं मत अजित पवारांनी मांडलं.
“येवल्यात तऱ्हेतऱ्हेच्या पैठणी आहेत. येवल्यात पूर्वी ३ हजार हातमागवार उत्पादन व्हायचं. पण आता ही संख्या अनेक हजारांवर आली आहे. ६ हजार लोकांना काम आलं आहे. आधी पैठणी आणि येवला एवढंच होतं. पण आता रेशीम उद्योगही सुरू आहे. जरीची उलाढाल ही मोठ्या प्रमाणात होत आहे. विणकर राव आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.