नाशिकः डबल, टीबल भावाने वीज खरेदी करत आहोत. त्यामुळे राज्यातील वीज संकट लवकरच दूर होईल, अशी ग्वाही गुरुवारी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना दिली. भुजबळ म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी हिंदू (Hindu) धर्मातील सामाजिक विषमतेतून सर्वसामान्यांना बाहेर काढण्याचे काम केले. या देशातील सर्व जणांना मार्ग दाखवला. हा आनंदाचा दिवस आहे. उत्साह असला तरी अशांततेचे गालबोट लागायला नको, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्र न्यायालय प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या यांना जामीन नाकारत आणि हे लपून बसतात. त्यानंतर ते हायकोर्टात गेले, पण कोर्टाने (Court) कारवाई करू नका, असे सांगितले नसल्याचे ते म्हणाले. पोलीस योग्य ती कारवाई करतीलच. फक्त न्याय व्यवस्थेच्या बाबतीत जनतेत शंका निर्माण नको व्हायला, बाबासाहेबांच्या कायद्याला तडा जायला नको यासाठी न्यायव्यवस्थेने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पंकज भुजबळ यांनी कालच शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची सपत्नीक भेट घेतली होती. यावरही छगन भुजबळांनी मौन सोडले. ते म्हणाले, राज यांना नातू झाला म्हणून पेढ्यासहित पंकज यांनी सपत्नीक भेट घेतली. यात वावगे काही नाही. विरोधी पक्षातील लोकांना विरोधक मानतो, शत्रू मानत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. खरे तर राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्यानंतर ही भेट झाली. त्यामुळे ती विशेष चर्चेत होती. मात्र, या भेटीमागे कुठलेही राजकीय कारण नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त नाशिक शहरातील शालिमार व नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रात्री 12 वाजता पुष्पहार अर्पण करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. तसेच राज्यातील जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार देवयानी फरांदे,माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर, डॉ.शेफाली भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे आदी उपस्थित होते.