नाशिक : शिंदे गट आणि भाजपने एकत्रितपणे विधानसभा, महापालिका आणि लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या दोन्ही पक्षांनी तशी तयारीही सुरू केली आहे. एकत्र सभा घेण्यावर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा भरही दिसत आहे. मात्र, असं असलं तरी प्रत्यक्षात वेगळंच राजकारण घडताना दिसत आहे. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघावरही भाजपचा डोळा असल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमले आहेत? त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून युतीत खडा पडल्याचं बोललं जात आहे. भाजपने शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात संयोजक नेमण्याचं कारण काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
शिंदें गटाचा दावा असलेल्या मतदारसंघात भाजपाने संजयोजक नेमले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे यांना, तर शिर्डीत सुजय विखे-पाटील यांना संयोजक म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे.
हे भाजपाचे दबावतंत्र आल्याची शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे. भाजपने अचानक हे संयोजक नेमल्याने भाजप शिंदे गटावर कुरघोडी करत आहे काय? असा सवाल केला जात आहे. तसेच शिंदे गटाचे मतदारसंघ ते आमचेच मतदारसंघ अशा पद्धतीने भाजप वागत आहे काय? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेला 22 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 18 जागांवर शिवसेना निवडून आली होती. त्यातील 13 खासदार शिवसेनेतून फुटले. ते शिंदे गटात आले. भाजपला जर मतदारसंघाचा आढावा घ्यायचा होता तर त्यांनी संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात घ्यायचा होता. किंवा शिवसेनेला ज्या 23 जागा सोडण्यात आल्या त्या मतदारसंघात संयोजक नेमून आढावा घ्यायचा होता.
13 मतदारसंघातच संयोजक नेमण्याचं कारण काय? यामागे काय काळंबेरं आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. शिंदे गट ही स्वतंत्र पार्टी आहे. तिची भाजपशी युती आहे. ही पार्टी भाजपमध्ये विलीन झालेली नाही. असं असताना मित्र पक्षाच्या मतदारसंघात भाजपची घुसखोरी करण्याचं कारणच काय? असा सवालही केला जात आहे.
भाजप कॅडरबेस पार्टी आहे. संयोजक नेमल्यामुळे शिंदे गटात अजिबात नाराजी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठीच संयोजकांनी नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवार निवडण्याचा किंवा जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार नाही. भाजपाच्या या अभियानाचा फायदा आमच्या दोन्ही पक्षांना होणार आहे. शिंदे गट नाराज होण्याचा किंवा अस्वस्थ होण्याचा काहीच प्रश्न नाही. फक्त मोदींजींचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अम्ही काम करणार आहोत, असं भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं.