भाजपचा आणखी एका निवडणुकीत पराभव, दोन ठिकाणी उमेदवारच मिळाला नाही; कुठे बसला फटका?
धुळ्यातील एका स्थानिक निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. या निवडणुकीत जवाहर पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता 7 तारखेला इतर जागांसाठी मतदान होणार असून निकाल लागणार आहे. पण त्यापूर्वी भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत.
धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच विजयी घोडदौड सुरु केली आहे. या निवडणुकीत जवाहर शेतकरी विकास पॅलनचे पोपट सहादू शिंदे आणि अरविंद भालचंद्र शिरसाठ हे दोन उमेदवार संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाप्रणित पॅनलला सुरुवातीलाच चांगला झटका बसला आहे.
धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. 7 जूलै रोजी होणार्या निवडणूकिसाठी काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विरोधी भाजपा प्रणित पॅनलला दोन जागांवर उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून उडाणे येथील पोपट सहादू शिंदे आणि अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून धनुरचे अरविंद भालचंद्र शिरसाठ हे बिनविरोध विजयी झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आमदार पाटील यांच्या पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने भाजपाला पुन्हा एकदा चांगला दणका बसला आहे.
उत्साह संचारला
आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी विकास पॅनलकडून उर्वरीत 15 जागांसाठी संभाजी सिधुजी गवळी, इंद्रिसिंग नथुसिंग गिरासे, रोहिदास विठ्ठल पाटील, विलास वसंतराव चौधरी, रमेश दत्तात्रय नांद्रे, कैलास हिंमतराव पाटील, भटू गोरख पाटील, चुडामण सहादू मराठे, बापू नारायण खैरनार, दिनकर दौलत पाटील, सुनिल यादवराव पाटील, लहू काशिनाथ पाटील, सुशिला भगवान चौधरी, अनिता योगेश पाटील, पंढरीनाथ बुधा पाटील आदी निवडणूक रिंगणात आहेत.
उर्वरीत जागांसाठी 7 जुलै रोजी मतदान होणार आहे. शेवटच्या दिवशीच पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी घौडदौड सुरु केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.