नाशिक : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची ही बस थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, समृद्धी महामार्गावरही भीषण अपघात झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. आज पहाटे 6.30 ते 6.45 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचं दर्शन करून भाविक येत असताना बस दरीत कोसळली. शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने एक प्रवाशी जागीच ठार झाला तर अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. ही बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांनी या अपघाताची माहिती दिली. पहाटे साडे सहा ते पावणे सातच्या दरम्यान हा अपघात झाला. भाविक सप्तश्रृंगी गडावरून दर्शन घेऊन येत असताना यू टर्न घेताना ही बस दरीत कोसळली. त्यात 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी एक शार्प टर्न आहे. तिथून वळण घेत असताना बस चालकाला बस कंट्रोलमध्ये ठेवता आली नसावी, त्यामुळे हा अपघात झाला असेल. पण त्या विषयी घाईत सांगणं योग्य होणार नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
औरंगाबादच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रक आणि खासगी बस दरम्यान हा अपघात झाला. आज सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स किती सुरक्षित आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्स मुंबई, पुणे आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर जात असतात. त्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे. या खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करणं आवश्यक आहे.
मात्र संबंधित आरटीओ विभाग आणि पोलीस विभागाकडून केली जात नाही आहे. तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या खासगी ट्रॅव्हल्समध्ये वाहतु होत असून दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स अव्वाच्या सव्वा भाडा आकारात असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे संबंधित खाजगी ट्रॅव्हल्स धारकांकडे लक्ष देणं गरजेचं झाला असून, अशी मागणी प्रवाशांकडनं केली जात आहे.