नाशिक | 18 नोव्हेंबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज इगतपुरी येथे कार्यक्रमात आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचं आवाहन केलं. “आमची प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा आमची विनंती आहे. त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आम्हाला सांगाना, आम्ही कुठे चुकलोय. राज्यात काय चाललंय ते सांगा, त्याच्यावर विचार करा. आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करत आहोत. दूर ढकलण्याची नाही. किंबहुना या राज्यात जे समजदार आहेत, समाज, वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या पदावर काम करणारे लोक असतील, त्यांना माझी एकच विनंती आहे, त्यांनी आमचंसुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं. आमचा आक्रोश काय आहे हे सुद्धा समजून घ्यावं. मग आम्हाला सांगावं की आमचं चुकलं कुठे?”, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं.
“आम्ही कुणाला नाही म्हणतोय? पण तुम्ही एकदम सगळंच घेऊन चालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामध्येही तुम्ही 85 टक्के, 60 टक्क्याच्यावर 40 टक्के आहेत. त्यामध्ये तुम्हीच. कुणबी प्रमाणपत्र घेऊनसुद्धा तुम्हीच. अरे पण बाकीच्यांनी जायचं कुठे?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला. “ते म्हणतात आम्ही भुजबळाला पाडू. अरे भुजबळाला पाडणं सोडा, भुजबळ कित्येकांना पाडेल, याचा हिशोब करा,” असंदेखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
“तुम्ही समजदार असाल तर सांगा आमच्याकडून काय चुकलं? आम्ही चुकलो तर आम्हाला सांगा. बाकीचे चुकले तर त्यांना सांगा. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, सर्वांना सोबत घेऊन गेले. मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे. मला दोन महिन्यांपासून धमकीचे फोन येत आहेत. तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. अरे काय राज्य आहे?”, अशी भूमिका भुजबळांनी मांडली.
“हे गावबंदी करतात. याला गावात येऊ द्यायचं नाही, त्याला गावात येऊ द्यायचं नाही. येऊद्या ना गावामध्ये. काही म्हटलं तर त्याचं ऐकून घ्या. पटलं तर ठीक आहे. त्याला निवडून द्या. नाही पटलं तर नका निवडून देऊ. आम्ही कुठे म्हणतोय, पण गावातच येऊ देणार नाही, अशी भूमिका. दोन-चार टकली बोर्ड लावून टाकतात म्हणून मी काल म्हणालो की, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का?”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“मला पोलिसांना सांगायचंय, गावबंदीचे बोर्ड ताबोडतोब काढून टाका. अरे संविधानामध्ये 19 वं कलम आहे. या देशात कुणही कुठेही जाऊ शकतो, फिरु शकतो, आपण त्याला आडकाठी करु शकत नाही. पोलिसांचं काम आहे. पोलीस कधी अॅक्शन घेणार? कोणीतरी आमच्यासारखे लोकं जातील, काठीला काठी लागेल, डोके फुटतील, तेव्हा तुम्ही जागी होणार का? अशी बंदी कोण कुणाला करु शकतो?”, असे सवाल भुजबळांनी केले.