ठाकरे आणि पवारांना सहानुभूती, छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर आता भुजबळांनाही तेच वाटतंय?
मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांच्या मनात सहानुभूती असल्याचं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील नुकतंच शरद पवार यांच्यापाठीमागे सहानुभूतीची लाट असल्याचं म्हटलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतंच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच मंत्री छगन भुजबळ यांचंदेखील तसंच मोठं वक्तव्य समोर आलं आहे. शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना सहानुभूतीमुळेच गर्दी झाली, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसेच सहानुभूतीचं रुपांतर मतपेटीत कसं होतं ते 4 जूनला कळेल, असंही भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“ज्या अर्थाने त्यांच्या सभा एवढ्या मोठ्या होत आहेत, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्याअर्थी त्यांच्याभोवती काही एक सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे हे मी म्हटलेलं आहे. आहे ते आहे सगळं. त्याशिवाय मोठमोठ्या सभा झाल्या नसत्या. त्यांच्या पाठिमागे काही सहानुभूती आहे आणि ती असणार. त्यात काही वाद नाही. पण आता त्या सहानुभूतीचं रुपांतर मतपेटीत कसं आणि किती होतं ते आपल्याला 4 तारखेला कळेल”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
‘पवार-ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीचा मविआला फायदा’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
अजित पवार गटाच्या दोन मोठ्या नेत्यांनी शरद पवारांना सहानुभूती मिळत असल्याचं वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील लोकसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील आणि केंद्रात सत्ताबदल होईल, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा दावा केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण नेमंक काय-काय म्हणाले?
- “भाजपला बहुमत मिळणं अवघड आहे. त्यांना देशात 272 जागाही मिळणार नाहीत”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
- “अब की बार 400 पार ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंगलट आली. देशात भाजपने द्वेषाचं आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण सुरु केलं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
- “राज्यात मविआला 32 ते 35 जागा मिळतील. शिंदे गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात. अजित पवार गटाला एकही जागा जिंकता येणार नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लोकांची सहानुभूती आहे. या सहानुभूतीचा मविआला फायदा होईल”, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.