उघडेबंब पुजारी अर्धनग्न नसतात का?, पुजाऱ्यांनीही सदरा घालावा; ड्रेस कोडवरून छगन भुजबळ यांची खोचक टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसद भवनाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. त्यावेळी करण्यात आलेल्या धर्मकांडावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. प्रत्येकवेळी विरोधकांना डावलणं हे योग्य नाही, असं भुजबळ म्हणाले.
नाशिक : शाळेला सुट्टी लागल्यावर एखादा मुलगा मंदिरात हाफ पँट घालूनच जाणार ना… म्हणे ती हाफ पँट आहे. अरे…हा तर मूर्खपणा आहे. मूर्खपणा आहे हा. वाट्टेल तसे कापडे घालू नये, नीटनेटके कपडे घालावे हे मी समजू शकतो. सर्वांनीच जर नीटनेटके कपडे घालायचे असतील तर आतमध्ये जे उघडेबंब असतात ना पुजारी वगैरे त्यांनी सुद्धा अंगात सदरा बिदरा घालावा. गळ्यात माळ घातल्यावर कळेल हा पुजारी आहे म्हणून. ते सुद्धा अर्धनग्न नसतात का?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
आमच्याकडे उमेदवार आहेत. कोण कुठला पक्ष ताकदवार आहे. कुणाकडे प्रबळ उमेदवार आहेत. आम्ही तेच सांगत आहोत. 19 जागा आम्ही घेणार असं त्यांनी म्हटलं. त्यावरून हा वाद सुरू झाला. अशा चर्चा थांबवल्या पाहिजे. ही जागा वाटपाची चर्चा आहे, त्याची मीडियात चर्चा करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार जागा वाटपाचं ठरवतील. त्याची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आम्ही निवडणुकीला तयार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्या घ्या निवडणुका. आम्ही तयार आहोत. राजकीय पक्षांनी ककधीही निवडणुका झाल्या तर त्याला तयार राहिलं पाहिजे. आम्ही तयार आहोत. पण ते निवडणुका घेणार की नाही घेणार माहीत नाही. उगाच आवई उठवली जातेय का तेही माहीत नाही. कर्नाटकात ज्या प्रकारे पानीपत झाले आहे, ते लक्षात घेता पाऊल उचलतील असं वाटत नाही. लोकसभा आणि विधानसभेत अडचण होऊ नये असेल असं त्यांना वाटत असेल, असंही त्यांनी सांगितलं.
इथे राजाचा संबंध येतो कुठे?
सेंगोल एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायची प्रथा असेल. अरे इथे राजाचा संबंध येतो कुठे? ही लोकशाही आहे. भारताची जनता ही राजा आहे. हे सर्व करून पंतप्रधानांनी केलं ते खरोखर वेदना देणारं होतं. तुम्ही संसद भवन बांधलं. त्यात सुविधा दिल्या, ते बरोबर आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येकवेळेला विरोधकांना डावलता ते योग्य नाही. हे लोकशाहीचं मंदिर आहे. आपण सर्व धर्मीयांना घेऊन चालवणार हे आपलं संविधान आहे. अशावेळी आपण जे काही करत आहोत, ते जगही पाहत आहे. हा एवढा चांगला कार्यक्रम त्यांना करता आला असता, पण काय करणार? असं हताश उद्गार त्यांनी काढलं.