नाशिक : कोरोना रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी न देता थेट रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जुलै) येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “ऑक्सिजन प्लँट त्वरित कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.”
“खतांच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच खतांचा साठा मुबलक प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे,” असे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
येवला तालुक्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदतीचे वाटप यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेशाद्वारे करण्यात आले.
कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणाऱ्या निफाड तालुक्यातील युवकांचा सन्मान करून त्यांचे यावेळी भुजबळ यांनी अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, उपअभियंता उमेश देशमुख, गटविकास अधिकारी संदीप कराड, उन्मेष देशमुख, कृषिविकास अधिकारी रमेश शिंदे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.