नाशिक: मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी चांगलेच फटकारले आहे. तुम्हाला हनुमान चालिसा (hanuman chalisa) वाचायचा असेल तर तुमच्या घरात वाचा. दुसऱ्यांच्या घरात जायची गरज काय? खाजवून खरूज कशासाठी काढत आहात? कशाला कुणाला खिजवता? असं सांगतानाच तुमच्या या चिथावणीमुळे शिवसैनिक आक्रमक होत आहेत. तेही महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या महाप्रसादात बुक्कांबा, लाथाटकी आणि बुक्काकोट असतो. त्यामुळे शांततेनं घ्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्रं निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत असून राणा दाम्पत्यांचा बोलविता धनी वेगळाचा आहे, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आपल्या घरात हनुमान चालिसा वाचा. मुंबईत आणि अमरावतीत बजरंगबलीची अनेक मोठी मंदिरे आहेत. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्यात काय अर्थ आहे? खाजवून खरूज कशासाठी काढत आहात. कशासाठी खिजवण्याचा प्रयत्न करत आहात. हा स्टंट आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक होत आहेत. आम्ही राणा दाम्पत्यांची वाट बघतोय असं शिवसैनिक म्हणत आहे. राणा दाम्पत्यांना महाप्रसाद द्यायचा आहे, असं ते सांगत आहेत. आरती, पठण झालं तर महाप्रसाद द्यावा लागतो, असंही ते सांगत आहेत. मी एकाला फोन केला. त्याला म्हटलं कसला महाप्रसाद रे? तो म्हणाला, लाथापेटी आहे. बुक्कांबा आहे. असे वेगवेगळे पदार्थ आहेत. या महाप्रसादात त्याचा समावेश आहे. राणा दाम्पत्य आले तर त्यांना द्यायचे आहेत. मी त्यांना म्हटलं शांततेने घ्या म्हटलं. प्रसादही शांततेने द्या म्हटलं, असा मिश्किल टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
शिवसैनिकांच्या महाप्रसादात लाथाटकी, बुक्काकोट असतो, असं सांगतानाच राणा दाम्पत्यांच्या पाठीमागे बोलविते धनी वेगळे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करायची, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हे केंद्राला सांगायचे. हे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, असं भासवायचं. अशा पद्धतीने कुणाच्या तरी घरावर जायचं आणि तमाशा करायचं हे कुणी सांगितलं? लोकं कशी गप्प बसतील. शिवसेना त्यांच्या पद्धतीने उत्तर देणारच. जनतेलाही कुणाच्या घरावर जाणं आवडणार नाही. आमच्या घरावर विरोधकांनी येऊन तमाशा करणं आवडणार नाही. शांततेने राजकारण करावं. हे कुठून आणलं. या देशातील हा महत्त्वाचा मुद्दा आहे का? रोजगार, महागाई शिक्षण आहे. काय चाललंय देशात उगाच दंगे भडकवण्याचं काम आहे हे, अशी टीकाही त्यांनी केली.
राणा दाम्पत्य शिवसेनेला चॅलेंज करत आहेत हे दाखवण्याचा हा प्रकार आहे. त्यातून केंद्राची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. ही हुकूमशाही आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलतात. पण यांनी काय केलं. नवाब मलिक बोलायला लागले म्हणून त्यांना आत टाकलं. प्रत्येक गोष्टीत ईडी लावता. आधी पवारांच्या घरावर हल्ला करता, आता सीएमच्या घरावर. घरावर जाऊन दंगे करण्याची ही कोणती लोकशाही आहे? असं करण्याची त्यांची भाजपच्या पाठबळाशिवाय हिंमत होणार नाही. त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच त्यांचं धाडस होतं. लोकांना हे आवडत असेल असं भाजपला वाटत असेल तर ते चूक आहे. राज्यात केवळ सरकार नाही म्हणून हे सुरू आहे. राज्य अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, असा हल्लाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: