आणखी एक संघटना एकनाथ शिंदेंच्या सोबत, ‘या’ अटी शर्तीवर संघटनेचा पाठिंबा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी छत्रपती सेनेचे शिष्ट मंडळ मुंबईत भेटीसाठी गेले होते.
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांना पाठिंबा देण्यासाठी याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सुरुवातीला आमदार, (MLA) नंतर खासदार, (MP) माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा प्रवेश आणि पाठिंबा दिसून आला आहे. त्यातच आता सामाजिक संघटना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे. राज्यातील छत्रपती सेना (Chhatrapati Sena) या संघटनेने देखील शिंदे यांची भेट घेत आपल्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे पत्रक देत राजकीय (Political Party) पक्षाबरोबर पहिल्यांदाच जोडलो जात असल्याचे देखील संघटनेच्या पत्रात म्हंटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी छत्रपती सेनेचे शिष्ट मंडळ मुंबईत भेटीसाठी गेले होते.
दरम्यान पत्रात संघटनेने महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने प्रगती व विकास घडेल असे चित्र आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण झाले व ते सत्यात उतरत असल्याचे म्हंटले आहे.
याशिवाय, छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना अठरा पगड जाती, बारा बलुतेदार, सर्व जाती पंथाच्या नागरिकांना घेऊन मागील 6 वर्षापासून काम करीत आहे.
23 जिल्ह्यात पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतक कार्यरत आहे. जवळपास संघटनेच्या माध्यमातून 85 ते 90 हजार युवक-युवती जोडले गेले आहेत.
मागील सहा वर्षात संघटने च्या माध्यमातून ५८०पेक्षा जास्त विषय हाताळले व निर्णयाक भूमिका घेऊन सदर विषयास न्याय दिला असल्याचे नमूद केले आहेत.
छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य सदर संघटना कोणत्याही राजकीय पक्षासोबत अथवा व्यक्ती सोबत जोडली गेलेली नाही. ही पहिलीच वेळ असून जाहीरपणे आपल्यासोबत येण्याची तयारी दर्शवत असल्याचे म्हंटले आहे.
यामध्ये हिंदुत्व, रोजगार, राज्याची विविध मंडळे, स्मारके, फेरीवाला मॉडेल, बांग्लादेशी घुसखोरी, शालेय फी स्ट्रक्चर, टोलचे दर यांसह विविध मुद्यांचे पत्रक संघटनेने शिंदे यांना देत न्याय देण्याची मागणी केली.