धुळे | 3 सप्टेंबर 2023 : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची क्रेझ संपूर्ण राज्यात आहे. गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम झाला नाही असा एकही जिल्हा राज्यात नाही. तसेच गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला गर्दी झाली नाही, असही कधी झालं नाही. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे. प्रत्येक कार्यक्रम गर्दी खेचणारा असतो. टाळ्या, शिट्ट्या आणि लाठीमार हे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्ये आहे. लोकप्रियतेच्या प्रचंड शिखरावर असलेल्या गौतमीसाठी मात्र एक वेदनादायी बातमी आहे. गौतमीचे वडील हायवेवर बेवारस अवस्थेत आढळून आले. त्यांची प्रकृतीही बिघडलेली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गौतमीच्या वडिलांची ही अवस्था पाहून एकच खळबळ उडाली आहे.
गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे दोन दिवसांपूर्वी धुळ्यातील सूरत बायपास हायवेवर बेवारस अवस्थेत आढळून आले. ते आजारीही होते. स्वराज्य फाऊंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांना पाटील बेवारस अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी पाटील यांना येथील जिल्हा रुग्णालयात हलवले. स्वराज्य फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था बेवारस व्यक्तींसाठी काम करते.
रवींद्र पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या खिशाची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या खिशात आधारकार्ड सापडले. त्यावर रवींद्र बाबूराव पाटील असं लिहिलं होतं. राहणार वेळोदे तालुका चोपडा असा त्यावर पत्ता लिहिला होता. पाटील यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यानंतर पाटील हे गौतमी पाटील हिचे वडील असल्याचं आढळून आलं.
एव्हाना गौतमी पाटीललाही वडिलांच्या प्रकृती माहिती मिळाली. त्यामुळे गौतमी हिने वडिलांना तात्काळ धुळ्याहून पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. रवींद्र पाटीलयांना धुळ्याच्या हिरे रुग्णालयातून पुण्यात हलविण्यात आले आहेत. गौतमीनेही आपल्या वडिलांच्या उपचाराचा सर्व खर्च आपण करणार आहोत. आपल्या देखरेखीतच त्यांच्यावर उपचार करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पाटील यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर शोभा आनंद नेरपगार (पाटील) या त्यांच्या मुलीसह सर्वात आधी हिरे रुग्णालयात पोहोचल्या. शोभा पाटील या रवींद्र पाटील यांच्या भावजय आहेत. त्यांनीच रवींद्र पाटील हे गौतमीचे वडील असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर, रवींद्र पाटील हे गौतमी पाटील हिचे वडील असल्याचं दुर्गेश चव्हाण यांनाही माहीत नव्हतं. मात्र, पाटील यांचा मेसेज व्हायरल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे शंभरहून अधिक फोन आल्याचं चव्हाण यांचं म्हणणं आहे.