Nashik :वणी गडावरील सप्तशृंगीचे दर्शन ऐन श्रावणात दीड महिना राहणार बंद, भाविकांनी या तारखा घ्या जाणून
सरकारच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार मंदिर बंद राहणार आहे. देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम या काळात करण्यात येणार आहे. तसेच गडावरील कामकाजाच्या अनुषंगाने मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाशिक– राज्यातील देवींच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी एक स्थान असलेले नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे (Saptashrugi mandir)मंदिर दीड महिना बंद असणार आहे. २१ जुलै ते ०५ सप्टेंबरच्या काळात सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेता येणार नाही (Darshan closed). ऐन श्रावणाच्या काळात देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. श्रावण महिना २९ जुलैपासून २८ ऑगस्टपर्यंत आहे. सरकारच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार मंदिर बंद राहणार आहे. देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम या काळात करण्यात येणार आहे. तसेच गडावरील कामकाजाच्या अनुषंगाने मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे श्रावणात देवीच्या दर्शनाची इच्छा बाळगणाऱ्या अनेक भाविकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. सप्तशृंगीच्या दर्शनासाठी नेहमीच या गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. देवीच्या दर्शनासाठी आता रोप वेचीही व्यवस्था करण्यात आल्याने दर्शन अधिक सुकर झाले आहे.
सप्तशृंगी ग़डावर पावसाने मोठे नुकसान
दरम्यान मंगळवारी नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडावर ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. यात गडावर मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. सप्तश्रृंगी गडाच्या मंदिराच्या खालच्या भागात असलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे गडावरील संरक्षक भिंतीवरील माती आणि दगड खाली आले आहेत. यात दोन मुलांसह सहा भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. आता पुढील काळात याची दुरुसीतीही करण्यात येणार आहे.
45 दिवस वणी गडावर दर्शन असणार बंद
साडे तीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेली सप्तशृंगी देवी ही अनेकांचे कुलदैवत आहे. तयामुळे गडावर उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या इतर भागातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. श्रावणात नाशिक जवळील त्रंबकेश्वरच्या दर्शनाला येणारे भाविकही देवीच्या दर्शनाला येत असतात. यावेळी मात्र या भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाही. ४५ दिवस मंदिर दुरुस्ती आणि इतर कामकाजासाठी बंद राहणार आहे.
स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि दुकानदारांचे होणार हाल
सुमारे दीड महिना ऐन श्रावणात सप्तशृंगी देवीचे मंदिर बंद राहणार असल्याने, स्थानिक दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गडाच्या पायथ्याची असलेल्या गावात अनेक जणांचा चरितार्थ हा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरच अवलंबून असतो. त्यात अनेक दुकानदार, हॉटेल्स, पुजारी यांचा समावेश आहे. आता दीड महिना दर्शन बंद असल्याने भाविकांची गडावरील संख्या रोडावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दीड महिन्यांच्या काळात चरितार्थ कसा करायचा, असा प्रश्न या सगळ्यांसमोर असणार आहे.