नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला आहे. नाशिकच्या अंबड पोलीस स्थानकाबाहेर गोंधळाचं वातावरण आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतादारांच्या स्लीप वाटपातून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावता नगर परिसरात दोन गटात वाद झाला. भाजप आणि ठाकरे गटाच्या समर्थकांनी अंबड पोलीस ठाणे बाहेर मोठी गर्दी केली आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर हे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना परतण्याचं आवाहन केल्यानंतर ते परत गेले. मोठमोठे पोलीस अधिकारी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले. कार्यकर्त्यांची भलीमोठी गर्दी पाहता सुरक्षेची सर्व काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना परत घेऊन जा, असंदेखील आवाहन पोलिसांनी केल्याची माहिती आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे समर्थक मतदार स्लीप वाटत होते. या दरम्यान ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी दोन्ही बाजूने वाद झाला. प्रचंड भांडण सुरु झालं. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूने हाणामारी सुरु झाली. या हाणामारीत सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता जखमी झाला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबड पोलीस ठाण्याबाहेर आले. यावेळी भाजपचे देखील कार्यकर्ते पदाधिकारी अंबड पोलीस ठाण्याबाहेर आले आहेत.
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंबड पोलीस ठाण्याबाहेर आल्याने मोठा गोंधळ उडाला. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा अंबड पोलीस ठाण्याबाहेर तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये कालदेखील अशाचप्रकारचा राडा झाला होता. तो राडा भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा राडा झाल्याचं चित्र आहे.