Nashik NCP Crisis | नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, मध्ये पोलीस, जोरदार घोषणाबाजी, पाहा VIDEO
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर नाशिकमध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा होताना दिसतोय. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शेकडोंच्या संख्येने जमले आहेत.
नाशिक : नाशिकमध्ये मोठा राजकीय गदारोळ बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि ते थेट सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे देखील भाजपसोबत गेले आहेत. भुजबळ यांची नाशिकमध्ये पक्षात चांगली पकड आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे नाशिकमध्ये मोठा गदारोळ बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी सुरु आहे.
नाशिक मतदारसंघ हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. इथे त्यांचा चांगला बोलबाला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेवर त्यांनी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी ताबा मिळवला आहे. पण हीच गोष्ट शरद पवार समर्थक गटाला मान्य नाही. त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत.
शरद पवार यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक घ्यायची आहे. पण छगन भुजबळ-अजित पवार गटाने त्यांना राष्ट्रवादी कार्यालयात येऊ जेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगा नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आलं आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण कार्यकर्ते ऐकून घेण्यास तयार नाहीत.
शरद पवार गटाचा कार्यालयाबाहेर ठिय्या
छगन भुजबळ यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. पण शरद पवार समर्थक कार्यकर्त्यांचा गट हा कार्यालयात जावून बैठक घेण्यावर ठाम होता. पण त्यांना आत जाता आलं नाही. त्यामुळे शरद पवार समर्थक गटाने थेट कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत बैठक घेतली.
शरद पवार समर्थकांची नेमकी भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन शेलार यांच्या नेतृत्वात शरद पवार समर्थक कार्यालयाबाहेर एकवटले आहेत. “पक्षाचं कार्यालय हे आमचं आहे. राष्ट्रवादी वेलफेअर फाऊंडेशनने आम्हाला त्या संदर्भात पत्रदेखील दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, शरद पवार यांच्या समर्थनार्थ मध्यवर्ती कार्यालयात बैठक घेण्यात यावी. पण पोलिसांनी आम्हाला अडवलं आहे. ते पक्षपात करतात असा आमचा आरोप आहे. त्यांवर वरिष्ठांचा दबाव असेल. पण हे कार्यालय आम्ही ताब्यात घेणारच”, अशी प्रतिक्रिया गजानन शेलार यांनी दिली.
अजित पवार समर्थकांची नेमकी प्रतिक्रिया काय?
“आम्हीपण शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आहोत. पण ते ज्या पद्धतीने मोर्चा घेऊन इथे आले आहेत त्याचं काहीच कारण नव्हतं. सर्वांना उद्याची बैठक मुंबईत आहे हे माहिती आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व छगन भुजबळ करतील. त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार होता”, अशी प्रतिक्रिया अजित पवार समर्थकांनी दिली.