दसऱ्याचा बारः एकट्या सिन्नर तालुक्यात एकाच दिवशी 124 ट्रॅक्टरची खरेदी!
दसऱ्याने नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठेत एकदम चैतन्य आणले असून, एकट्या सिन्नर तालुक्यात एकाच दिवशी 124 ट्रॅक्टरची खरेदी शेतकऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे.
नाशिकः दसऱ्याने नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठेत एकदम चैतन्य आणले असून, एकट्या सिन्नर तालुक्यात एकाच दिवशी 124 ट्रॅक्टरची खरेदी शेतकऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून साचलेले मळभ आणि अतिवृष्टीचा दणका यातून आपल्या रोजच्या जीवनात आनंद आणण्याचे काम दसरा सणाने केले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर या एका तालुक्यात 124 ट्रॅक्टरची शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे यातल्या एकाच दुकानातून 22 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. सिन्नर हा धनाढ्य शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दसऱ्यादिवशी झालेली खरेदी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यापाठोपाठ एकट्या सिन्नर तालुक्यात जवळपास 200 दुचाकी, 30 चारचाकी वाहनांची विक्रीही झाल्याची नोंद आहे. नाशिकमध्येही दसऱ्यादिवशी कोट्यवधींची सोन्या-चांदीची खरेदी करून नागरिकांनी लयलूट केली. दसऱ्याच्या दिवशी शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47750 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 66000 रुपये नोंदवले गेले. गेल्या महिनाभरापासून नाशिकच्या सराफा बाजारात सोन्याचे दर दिवसेंदिवस स्वस्त झाले आहेत. कारण एक सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810 होते. त्या तुलनेत दसऱ्यादिवशी या दरात अजून घसरण झालेली दिसली. त्यामुळे अनेकांनी दसऱ्याचा शुभ मुहूर्त पाहून सोने खरेदी करायला प्राधान्य दिले. विशेषतः पिवर सोन्याला जास्त मागणी होती. अनेकांनी भाव वाढतील म्हणून पूर्वीच सोन्याची बुकींग करून ठेवली होती, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नेवासे यांनी दिली. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रातही वेगवेगळ्या ऑफर सुरू असल्याने कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे समजते.
कांद्यालाही विक्रमी दर
लाल कांद्याच्या भावाने दसऱ्यादिवशी उच्चांकी सीमोल्लंघन करत नाशिक जिल्ह्यात क्विंटलमागे तब्बल 5151 रुपयांचा भाव पटकावला. त्यामुळे अतिवृष्टीने झोडपलेल्या आणि खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक पाहायला मिळत आहे. उमराणे (जि. नाशिक) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल असणाऱ्या पावसाळी कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा यांच्यासह कांदा व्यापारी उपस्थित होते. यावेळी उमराणे येथील शेतकरी रणजीत देवरे यांनी आणलेल्या कांद्याला क्विंटलमागे सर्वोच्च 5151 रुपयांचा भाव मिळाला. यावेळी शेतकरी देवरे यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इतर बातम्याः
अमृत महोत्सवानिमित्त भुजबळांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प; 74 लाख नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेणार
महंगाई डायन खाए जात हैः डोक्याला शॉट; नाशिकमध्ये डिझेल शंभरच्या पुढे!
अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चं शूटिंग पुन्हा सुरू, जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर शेअर केला खास फोटोhttps://t.co/9tfh5g3MkP#AkshayKumar #RamSetu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021