गिरीश महाजन यांची किंमत एक रुपयाची, जळगावातूनच मोठा आरोप; कुणाचा हल्ला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वैमनस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दोघेही एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका, आरोप प्रत्यारोप करत असतात. महाजन यांनी मागच्यावेळी खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूविषयी भाष्य केलं होतं. त्यामुळे समाजात बदनामी झाल्याचं सांगत खडसे यांनी महाजन यांना तुरुंगात खेचलं आहे.
किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 16 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात विस्तवही जात नाहीये. महाजन यांच्यावर टीका करण्याची खडसे एकही संधी सोडत नाही. खडसे यांनी आता पुन्हा एकदा महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्याजवळ गिरीश महाजन यांची किंमत फक्त एक रुपयाची आहे, असा जोरदार हल्ला एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे या हल्ल्यावर खडसे काय पलटवार करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध एक रुपयाचा दावा दाखल केला आहे. महाजन यांनी खोटे विधान करून छळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच त्यांनी महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हाही दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयात खडसे यांनी स्वतः उपस्थित राहुन वकिलांच्या माध्यमातून महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तसेच एक रुपयाचा दावा दाखल केला आहे.
समाजात बदनामीचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी खोटे विधान करून त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समाजात माझी बदनामी झाली, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा न्यायालयात महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच एक रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला आहे.
मुलाच्या मृत्यूवर भाष्य
महाजन यांनी माझ्या मुलाच्या मृत्यू विषयी संशयास्पद वक्तव्य केले होते. तसेच माझ्या आजाराविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केलं होतं. यामुळे समाजात माझी बदनामी झाली. त्यामुळे महाजन यांच्याविरुद्ध कोर्टात दाद मागितली आहे, अशी माहिती खडसे यांननी दिली. ॲड हारुल देवरे तसेच ॲड. अतुल सूर्यवंशी यांच्या माध्यमातून खडसे यांनी दावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांची किंमत माझ्याजवळ एक रुपयांची आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एक रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं.