राज्यात सरकारने कोरोनाचे नवे निर्बंध जारी केलेत.
यात नाशिकला दिलासा मिळाला असून आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेत.
नाशिकमध्ये आता हॉटेलमध्ये 50 टक्के ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुपारनंतर पार्सल सुविधा देखील सुरू ठेवता येईल.
नाशिकमधील निर्बंध शिथिल झाल्यानं गेल्या दीड वर्षांपासून अडचणीत आलेल्या मिसळ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिसळची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या मिसळ व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्यात.
आता यामुळे व्यावसायाची गाडी रुळावर यायला मदत होईल अशी भावना ते व्यक्त करत आहेत.
या विषयी बोलताना मिसळ व्यवसायिक म्हणाले, "या काळात सरकारने कोरोना नियंत्रणासाठी जे निर्बंध लावले ते आवश्यक होते. पण त्यामुळे हॉटेल व्यवसाय अस्थिर झाला."
"आता सरकारने रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचा जो निर्णय घेतला तो खूप समाधानकारक आहे," असंही मिसळ व्यावसायिकांनी नमूद केलं.
त्यामुळे एकूणच मिसळ खवय्यांसाठी आणि व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसत आहे.
यामुळे नाशिकची प्रसिद्ध मिसळ खाण्याचा मार्गही मोकळा झालाय.